Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुजरातमधील २४०० गावांना चक्रीवादळाचा तडाखा

 

अहमदाबाद : वृत्तसंस्था ।  गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सीमाभागातल्या गावांना बसला आहे. त्यामुळे २४०० गावं प्रभावित झाल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली आहे.

 

 

दोन दिवसांपासून तौते चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धुमाकूळ घातला होता. कोकण किनारपट्टीशी समांतर गेलेल्या या वादळामुळे किनारी भागात वादळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमधला वीजपुरवठा, रस्तेवाहतूक सोमवारी रात्री उशिरापर्यंत विस्कळीत झाली. शेकडो झाडं वादळाच्या प्रभावामुळ उन्मळून पडल्याचं देखील समोर आलं आहे. पण हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला समांतर गेल्यामुळे महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं नाही.

 

सोमवारी रात्री उशीरा या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू गुजरातमध्ये दीवजवळ पोहोचला होता. सौराष्ट्रच्या किनारी भागात लँडफॉल झाल्यानंतर तौतेनं सौराष्ट्रला जोरदार तडाखा दिला. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १६ हजार ५०० घरांचं नुकसान झालं असून या भागातल्या अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सतर्कतेची उपाययोजना म्हणून संभाव्य प्रभावित क्षेत्रातील गावं आधीच खाली करण्यात आली होती. गुजरातच्या किनारी भागातून तब्बल २ लाख नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं होतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टाळण्यात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना यश आलं आहे.  तरीदेखील चक्रीवादळामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाले  आहेत .

 

चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरू झाला, तेव्हा किनारी भागातल्या एकूण २४०० गावांमधला वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजेचे हजारो खांब उन्मळून पडले आहेत. या भागातले तब्बल १६० रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून तब्बल ४० हजार झाडं उन्मळून पडल्याची माहिती मुख्यमंत्री रुपाणी यांनी दिली आहे. “तुफान पाऊस आणि १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे प्रभावित भागात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असं रुपाणी यांनी स्पष्ट केलं.

 

गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर तौते चक्रीवादळाचा लँडफॉल झाल्यानंतर या वादळाची तीव्रता अतीधोकादायकवरून खूप धोकादायकपर्यंत खाली उतरली. मंगळवारी संध्याकाळपर्यंत या चक्रीवादळाची तीव्रता अजून कमी होईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.  दोन दशकांहून अधिक काळातलं तौते हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ होतं असं सांगितलं जात आहे. रस्ते उखडल्यामुळे करोना काळात उपचारासाठीचे ऑक्सिजन किंवा इतर गोष्टींचं दळणवळण प्रभावित झालं आहे. रस्ते दुरुस्त करून ही वाहतूक पूर्ववत करण्यावर आमचा भर असेल, अशी माहिती भावनगरचे जिल्हाधिकारी गौरांग मकवाना यांनी दिली.

 

Exit mobile version