Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा

गांधीनगर वृत्तसंस्था | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यामुळे राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वाचें लक्ष असणार आहे.

 

विजय रूपणी यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी रुपाणी यांनी दुसर्‍यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून रुपाणी आणि उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली होती.

 

विजय रूपाणी आणि पक्ष संघटनेमध्ये बरेच दिवस मतभेद सुरू होते असे म्हटले जात होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत त्यांचे मतभेद होते. गेल्या वर्षीच भाजपाने रूपाणींविरोधात पक्षाला अहवाल दिला होता. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची पकड सैल होत असल्याचेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे होते. कामाबाबत रूपाणी सरकारची प्रतिमा कमकुवत होत होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून गुजरात सरकारमधील नेतृत्व बदलण्याची चर्चा सुरु होती.

Exit mobile version