Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरीश महाजन आज पुन्हा अण्णा हजारे यांच्या भेटीला

अहमदनगर : वृत्तसंस्था । भाजप नेते गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत पोहोचले.

याअगोदरही एकदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती. आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. २ महिन्यांपासून अगोदरच दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. अशा परिस्थितीत अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे.

आज सकाळी गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. गेल्या आठवड्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली होती. मात्र अण्णा आंदोलनावर ठाम असल्याने भाजप नेते अण्णांची मनधरणी करत आहेत.

शेती मालाला दीडपट हमीभाव द्यावा , स्वामीनाथन आयोगाला संविधानिक स्वायत्तता द्यावी या अण्णांच्या मागण्या आहेत

गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यातली बैठक संपली आहे. अण्णांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री सोबत बैठक झाली असून काही निर्णय घेण्यात आले. कृषी माल भाव ठरवणारी उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या निर्णयाचे पत्र गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले. अण्णांनी आंदोलन करु नये अशी केली विनंती, महाजन यांनी अण्णांना केली. केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि भाजपनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी २२ जानेवारीला अण्णा हजारेंची भेट घेतली होती. फडवणीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं होतं. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेलं पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलं. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असं अण्णा हजारे म्हणाले होते.

काही वर्षांपूर्वी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी अण्णा हजारे आता जुने व्हिडीओ प्रसारित करणार आहेत. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्यावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आग्रही आहेत. मात्र आधी काँग्रेसने, तर आता भाजपने अण्णांना आश्वासनाच्या पलीकडे काहीही दिलेले नाही, असा आरोप अण्णांनी केलाय. २०११ मध्ये अण्णा दिल्लीत उपोषणाला बसले होते. त्यावेळी संपूर्ण देश अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. मात्र त्यावेळी भाजप नेत्यांनी त्याचा फायदा घेत अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर अण्णांच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, असं आश्वासन दिलं. मात्र पुढे सरकार येऊनही भाजपने देखील अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केलं.

या घटनाक्रमामुळेच अण्णा हजारे यांनी नवी शक्कल लढवलीय. आपल्याला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी अण्णांनी एक नवी रणनीती तयार केलीय. यानुसार अण्णा ज्या नेत्यांनी आतापर्यंत विविध आश्वासनं दिली, त्यांचे जुने व्हिडीओ एकत्र करून प्रसारित करणार आहेत. म्हणजेच अण्णा देखील आता मनसे प्रमुख यांच्या स्टाईलने ‘लावरे तो व्हिडीओ’ असं म्हणणार असल्याचं चित्र आहे.

Exit mobile version