Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावाच्या विकासाला स्वच्छता व एकजुटीसह श्रध्देची जोड हवी-पालकमंत्री

जळगाव प्रतिनिधी । कोणत्याही गावाचा विकासाला स्वच्छता व एकजुटीसह श्रध्देची जोड हवी, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते धानवड येथील श्री गजानन मंदिराच्या भूमिपुजनानंतर आयोजित कार्यकमात बोलत होते.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आज धानवड येथील ग्रामपंचायतीच्या जागेत उभारण्यात येणार्‍या श्री गजानन मंदिराचे भूमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, संत गजानन महाराज यांच्या कोणत्याही मंदिरातील स्वच्छता ही अगदी डोळ्यात भरण्यासारखी असते. हीच स्वच्छता आपल्या वैयक्तीक आणि सामूहिक जीवनात देखील खूप उपयोगाची आहे. अर्थात, याच्या जोडीला गावकर्‍यांची एकजुट हवी आणि आपल्याकडे श्रध्दा हवी. ना. पाटील पुढे म्हणाले की, गावाच्या विकासात राजकारण आणता कामा नये. सर्वांनी एकोप्याने मिळून काम केल्यास गावाचा खर्‍या अर्थाने विकास होत असतो.

यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी धानवड, शिरसोली, उमाळा, नशिराबाद परिसरातील सर्व रस्ते जळगाव शहराला जोळून रस्त्यांची कामे पूर्ण केल्याबद्दल व शेत रस्त्यांच्या कामांना सुरुवात केल्याबाद्दल धानवड ग्रामपंचायत, विकास सोसायटी, शेतकरी व ग्रामास्थान मार्फत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तर ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्री.गजानन महाराज मंदिर बांधकाम करणारे परभणीचे गजानन भक्त मारोती हाडे यांचा सत्कार केला.

यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्री गजानन महाराज मंदिराचे भूमिपूजन विधिवत पूजा करून करण्यात आले. मंदिरालगत भक्तांसाठी सभा मंडपा करिता १० लाखाचा निधी मंजूर करण्याचे व गावासाठी नवीन स्मशानभूमी बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकात प्रा.राजू पाटील यांनी श्री गजानन महाराज मंदिर बाबत महत्व विषद करून ना.गुलाबराव पाटील धानवड व परिसरात केलेल्या विविध कार्याचा लेखा जोखा सांगितला तसेच आभार प्रवीण शिंदे यांनी मानले.

सदर कार्यक्रम प्रसंगी पं. स. सभापती नंदलाल पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, रा.कॉं. चे अभिषेक पाटील, ग.स.चेअरमन मनोज पाटील,जळके वि.का. सोसायटीचे रमेश आप्पा पाटील, जनार्धन पाटील, ब्रिजलाल पाटील, रवि पाटील यांच्या सह अण्णासाहेब पंडित पाटील, स्व.जितेंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अरुण पाटील, योगेश बाविस्कर, नंदकिशोर पाटील व पदाधिकारी , परिसरातील सरपंच सोसायटी चेअरमन सदस्य यांच्या सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Exit mobile version