Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गारखेडा येथे विजेच्या धक्क्याने तरूणाचा जागीच मृत्यू

जामनेर प्रतिनिधी । वाळूचे डंपर खाली करत असतांना ट्रॉलीत इलेक्ट्रिक खंब्यावरील तार तुटल्याने घराच्या पत्र्यात उतरलेल्या वीजेच्या धक्क्याने २२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गारखेडा येथे रात्री घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील गारखेडा येथे जळगाव येथून आलेले वाळुचे डंपर (एमएच१९ झेड ८६००) वाळू खाली करून गल्लीतून बाहेर रोडवर काढत असताना चालकाने हलगर्जीपणा करून मागील ट्रॉली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गल्लीतील विजेच्या खांबावरील विज प्रवाहाची वायर त्यात अडकून तुटुन शंकर शिवाजी वैराट (वय-२२)च्या घरावर पडली. विजप्रवाह चालु असल्याने घरावरील पत्रे व इतर धातुच्या सामानात विजप्रवाह उतरला. याचा धक्का अगोदर शंकरच्या आईला बसला म्हणुन काय झाले बघायला गेलेल्या शंकरला विजप्रवाह उतरलेल्या लोखंडी अँगलचा स्पर्श झाल्याने जोरदार विजेच्या धक्क्याने शंकरचा जागीच मृत्यु झाला. ही घटना सोमवारी २७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मयताचा मृतदेहा शवविच्छेदन करण्यासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणला.

दरम्यान, डंपर चालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली होती. मात्र पोलिस प्रशासनकडून प्रतिसाद न मिळाल्याने आज एका सामाजिक संघटना व संतप्त नातेवाईकांनी जामनेर येथे रास्ता रोको केला. जोपर्यंत चालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहा ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. कालच्या घटनेचे गांभीर्य पहाता पोलिस प्रशासनाने लक्ष देवून काल रात्रीच गुन्हा दाखल केला असता तर आजच्या रोषाला त्याना सामोरे जावे लागले नसते. ईश्वर लक्ष्मण वैराट यांच्या फिर्यादीवरून संबधीत डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Exit mobile version