Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गांधी तीर्थ येथे संजीवक शेती कार्यशाळा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील गांधी तीर्थ येथे काल दि. ४ मे रोजी शेतऱ्यांसाठी ‘संजीवक शेती’ एक दिवसाची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील ४० शेतकरी सहभागी झाले होते. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमीटेड (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजण्यात आला होता त्यात एमकेसीएलचे तज्ज्ञ डॉ सतीष करंडे व गजेंद्र कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाश्वत शेती, विषमुक्त शेती, हवामान आधारीत शेती, मिश्र पीक पद्धत, शेती पुरक व्यवसाय इ. विषयाचे मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची सुरुवात संत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व सुतीहार अर्पण करण्यात आले. जळगावला केळीचे आगार म्हटले जाते तर येथे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. यासोबतच सोयाबीन, उडीद, मूग ही मिश्रपिके ही घेऊ लागला आहे. ही पिके घेण्यामागे थोड्या महिन्यांच्या अवधीत दोन पैसे मिळतील हा मुख्य उद्देश असतो. शाश्वत परवडणारी शेती करायची असेल तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असून संजीवक शेतीचा स्वीकार देखील करावा. आपल्या शेतात असलेल्या पिकाच्या ओळीमधील जागेचा सुयोग्य वापर व्हावा. ही पद्धत वापरल्याने मधल्या जागेत तणांची वाढ कमीत कमी होऊन जमीन स्वच्छ ठेवता यावी असे काही महत्त्वाचे बदल आपल्या शेतात करावे लागतात. पावसाच्या अनिश्चिततेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कधी जास्त तर कधी पाऊसच पडत नाही. अशा वेळी संजीवक शेती महत्त्वाची ठरते असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.

संजीवक शेती – बाजारपेठांच्या वाढत्या मागणी पूर्ण करण्यासाठी वारेमाप खते, कीटकनाशके, पाणी वापरले जाते त्यामुळे त्या दुष्परिणाम शेतीवर होत असतो. अशा वेळी शेती न परवडणारी ठरते हीच शेती शाश्वत करण्यासाठी संजीवक शेती मोलाची ठरू शकते. आपल्या शेतातील मातीचा दर्जा सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच प्रयत्न करावे लागणार आहेत. संजीवक मध्ये शेण, गोमूत्र, गूळ, पाणी ह्याचा वापर होतो. ह्यालापण १० दिवस ठेवून नंतर पाण्यात मिश्रण करून वापरात आणण्यात येते. पंचगव्य करताना शेणखत, गोमूत्र दही, दूध, नारळाचे पाणी, गूळ, केळी, पाणी ह्याचा वापर करण्यात येतो. ह्यालाही ७ दिवसाची प्रक्रिया आहे. पाण्यामधून शेतीला देता येते व त्याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांना दिसतो. याबाबत एमकेसीएलच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बी.डी. जडे, शेती विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय सोनजे उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाउंडेशनचे सुधीर पाटील यांनी तर प्रास्ताविक डॉ. अश्वीन झाला यांनी आणि आभार प्रदर्शन प्रशांत सूर्यवंशी यांनी केले.

Exit mobile version