Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गर्भवती महिलेसाठी पोलिस बनले ‘देवदूत’ !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रसुतिकळा आलेल्या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी वाहन मिळत नाही… शहरात पेट्रोलिंग करणाऱ्या माहिती मिळते… तत्पूर्वीच महिलेस प्रसववेदना सुरू होतात..पोलीस क्षणाचाही विलंब न करता पोलीस वाहनतून दावाखान्यात नेतात…आणि गोंडस मुलीला जन्म देवून मातेसह बालिका सुखरूप.. रावेर शहरातील मध्यरात्री ही घटना घडली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसूतीच्या कळा येत असताना दवाखाण्यात जाण्यासाठी वाहन नसल्याने गरोदर महिला देऊबाई जगदीश काठेवाड व तिच्या कुटुंबियांच्या मनाची घालमेल सुरु होती. रावेर पोलीस ठाण्याचे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र करोडपती सहकाऱ्यांसह रात्रीची गस्त घालत होते. रावेर-सावदा रोडवर शहरापासून १ किलोमीटर अंतरावर बिजास्नी देवी मंदिराजवळ शेतात काठेवाड लोक वास्तव्यास आहेत. त्यांनी सरळ या ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्यावेळी गर्भवती देऊबाईला प्रसूती कळा येत असून दवाखान्यात जाण्यासाठी वाहन नसल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता देऊबाईला पोलीस वाहनातून दवाखान्यात नेउन दाखल केले. माउली हॊस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ संदीप पाटील यांनी त्वरित उपचार केल्याने देऊबाईने गोंडस मुलीला जन्म दिला असून मातेसह बालिका सुखरूप आहे.

 

नेहमीप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर उप निरीक्षक करोडपती व गोपाल पाटील होते. त्यांना रात्री काठेवाड वस्तीवर हालचाल जाणवल्याने त्यांनी गाडी थांबवून चौकशी केली. कठीण वेळ असल्याने पोलीस मित्र म्हणून धावून गेले. देऊबाईला तात्काळ रात्री ४ वाजून ४० मिनिटांनी दवाखान्यात दाखल केले. डॉ पाटील यांना ही महिलेवर त्वरित उपचार केल्याने पहाटे ५ वाजवून ३५ मिनिटांनी या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. गरोदर महिलेला व तिच्या कुटुंबियांना कठीण काळात पोलीस उप निरीक्षक करोडपारीं व डॉ संदीप पाटील यांनी दिलेला मदतीचा हात समाजात आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. या महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस विभाग व उपचार करणाऱ्या डॉ संदीप पाटील यांचे आभार मानले आहे.

Exit mobile version