Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरीब मराठ्यांचा राजकीय वापर आणखी किती वर्षे ? — खासदार संभाजीराजे

 

मुंबई : वृत्तसंस्था । गरीब मराठ्यांचा राजकीय वापर आणखी किती वर्षे ?, असा सवाल करीत आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणासाठी आक्रमक असल्याचे पुन्हा स्पष्ट केले

येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही”, असं थेट आव्हानच संभाजीराजे भोसले यांनी दिलं आहे

भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा दौरा केला. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. “सकल मराठा समाजाच्यावतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. मी सांगू इच्छितो, २००७ सालापासून मी महाराष्ट्र पिंजून काढला कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय यासाठी माझा हा लढा आहे”, असं ते म्हणाले.

 

“मला सगळ्या मराठा समाजाला सांगायचंय की न्या गायकवाडांचा अहवाल अवैध ठरला आहे. आपला कायदा रद्द झाला आहे. आपण एसईबीसीमध्ये मोडत नाहीत. आपण सामाजिक मागास राहिलो नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास असं म्हटलंय. आपण त्याला आव्हान देऊ शकत नाही. आम्ही दु:खी झालो. तेव्हा मी म्हणालो की उद्रेक कुणी करू नका, कोरोनाचं संकट समोर आहे. आपण जगलो तर लढू शकतो. अनेकांना वाटलं की संभाजी छत्रपतींची ही मवाळ भूमिका का? म्हणून मला सांगायचंय की छत्रपतींच्या घरात माझा जन्म झाला म्हणून मी तशी भूमिका घेतली. पण लगेच दोन दिवसांत दोन्ही पक्षांकडून आरोप सुरू झाले. सत्ताधारी म्हणतात पूर्वीचा कायदा खराब होता, विरोधी पक्ष म्हणतो यांनी बाजू नीट मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. पण समाजाला तुमच्या भांडणात रस नाही. आमचं एकच मागणं आहे की मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका. माझ्यासकट सर्व खासदार, आमदार मंत्र्यांनी समाजाला काय दिलं”, असं संभाजीराजे म्हणाले.

 

यावेळी संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपाय म्हणून ३ पर्याय सुचवले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रपणेच यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं देखील यावेळी नमूद केलं.

 

रिव्ह्यु पिटिशन फाईल करायला हवी. ती फाईल करताना उगीच लोकांना दाखवण्यासाठी नको. फुलप्रूफ पिटीशन हवी. हे राज्य सरकारने करावं. रिव्ह्यु पिटिशन टिकली नाही, तर क्युरेटिव्ह पिटिशनचा दुसरा पर्याय आहे. जो अपवादात्मक परिस्थितीत करायचा असतो. पण राज्य सरकारला पूर्ण तयारीनिशी पिटिशन करावी लागेल. कलम ३४२ अ च्या माध्यमातून राज्य सरकार आपला प्रस्ताव केंद्र सरकारला देऊ शकतं. राज्यपालांच्या माध्यमातून तो दिला जाऊ शकतो. पण राज्यपालांना भेटायचं म्हणजे पूर्ण डाटा पुन्हा उभा करावा लागेल. गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यासाठी ५ ते ६ महिने जातील. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाईल, तिथून ते केंद्रीय मागास वर्गीय आयोगाकडे जाईल, तिथून ते केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाईल असे हे पर्याय आहे

दरम्यान, मराठा समाजाने ओबीसी वर्गामध्ये जावं का? या चर्चेविषयी देखील खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. “अनेक लोकांची इच्छा आहे की आपण ओबीसीमध्ये जावं. त्यासाठी सगळ्यांना आपापलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर नेहमी हा विषय मांडतात. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील हा विषय मांडतात. पण ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग निर्माण करून देता येऊ शकतो का? हे मी नाही सांगणार. सरकारने सांगायचं, उद्धवजींनी सांगायचं, पूर्वीच्या सरकारने सांगावं, देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. सगळं आम्हीच सांगायचं का? तुम्ही भूमिका स्पष्ट करा ना”, असं ते म्हणाले

 

“खासदार-आमदारांची जबाबदारी आहे. म्हणून मी त्या दिवशी नाशिकमध्ये आक्रमक झालो. मी अस्वस्थ झालो आहे. हे सत्ताधारी आणि विरोधक असे कसे वागायला लागलेत? समाजाला न्याय द्या ही माझी भूमिका होती. म्हणून आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला. कायदेतज्ज्ञांना भेटलो, अभ्यासकांनाही भेटलो. भावना समजू घेतल्या. याप्रसंगी मराठा समाजातले लोकं इतके दु:खी आणि अस्वस्थ आहेत. वेळप्रसंगी कायदा हातात घेतील अशी अवस्था आहे. पण माझ्यामुळे सगळे शांत आहेत. आम्हालाही आक्रमक होता येतं. पण ही वेळ आहे का आक्रमक व्हायची? किती वर्ष आपण या वर्गाचा वापर करायचा? मराठा समाजातला ३० टक्के वर्ग कधीच रस्त्यावर येत नाही. फक्त ७० टक्के गरीब वर्ग रस्त्यावर येत असतो. पण यापुढे आम्ही कुणीच हे चालून देणार नाही”, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

 

Exit mobile version