Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाउनचे नावही नको — अजित पवार

 

पंढरपूर : वृत्तसंस्था । अजित पवार यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. गरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाउनचे नावही नको असं ते म्हणाले . अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असं आवाहन वारंवार राज्य सरकारकडून केलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील यावेळी लाट नाही तर त्सुनामी येईल अशी भीती व्यक्त केली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे.

“गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. लॉकडाउनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाउन घोषित केले तेव्हा सर्वांनी निमूटपणे आदेश पाळला,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काळजी घेण्याचंही आवाहन केलं. यावेळी अजित पवारांनी पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे सांगत आपण उपमुख्यमंत्री पदावर समाधानी असल्याचं सांगितलं.

“अवघ्या जगासमोर कोरोनाचं आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचं आहे. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

अजित पवारांनी यावेळी आपण अनुदानाचे पैसे जमा झाल्याची ऑर्डर घेऊन आल्याची माहिती देताना आषाढीच्यावेळी दिलेल्या चेकचे पैसे जमा झाले नव्हते ही आमची चूक असल्याचं मान्य केलं. “मागे राज्याचे प्रमुख आले तेव्हा पंढरपूरसाठी पाच कोटींचा चेक दिला होता. पण ते पैसे जमा झाले नव्हते. ही आमची चूक आहे. जेव्हा आपण चेक देतो तेव्हा पैसे जमा झाले पाहिजे. त्यामुळे कालच ऑर्डर काढून, ते पैसे जमा करुन जायचं असं अर्थमंत्री या नात्याने मी ठरवलं होतं. नगराध्यक्षांकडे ती ऑर्डर सुपूर्त केली आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

लोक ऐकणार नसतील तर टप्प्याटप्प्याने पुन्हा निर्बंध लागू केले जातील असा इशारा याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. भटकंती करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाणार असून पुन्हा टाळेबंदी होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

Exit mobile version