Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गझलकार इलाही जमादार यांचे निधन

 

पुणे : वृत्तसंस्था । सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसलं. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठी , हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने गझल पोरकी झाल्याची भावना गझलप्रमींमध्ये आहे.

इलाही जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगलीतील दुधगावमध्ये झाला. १९६४ पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. लिखानात जादू आणि कवितेविषयीच्या जाणीवेमुळे त्यांनी अत्यंत कमी काळात कविता आणि गझलक्षेत्रामध्ये आपले नाव कमावले. पुढे त्यांच्या गझलांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, सुरेश भट यांच्यानंतर गझलेला समृद्ध करणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले.

गझलकार इलाही जमादार यांची शब्दांवर चांगली पकड होती. शब्दांची जाण असल्यामुळे त्यांच्या कविता थेट मनाला भिडत. मराठी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकं, मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. २०२० च्या जलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जखमा अशा सुगंधी , भावनांची वादळे , दोहे इलाहीचे, मुक्तक आदी इलाही जमादार यांचे काव्य आणि गझल संग्रहही प्रसिद्ध आहेत.

Exit mobile version