Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खोटी साक्ष देणार्‍यास दंड व शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । मारहाणीच्या खटल्यात न्यायालयात खोटी साक्ष दिल्यामुळे एका साक्षीदारास न्यायालयाने ५५० रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा ठाठावली आहे.

याबाबत वृत्त असे की, १२ जुलै २०१५ रोजी जिन्सी (ता. रावेर) येथे चरणसिंग सरीचंद पवार (वय ४१) यांनी घराबाहेर ट्रॅक्टर उभे केले होते. या ट्रॅक्टरचा काही भाग रस्त्यावर येत असल्यामुळे छगन ग्यानसिंग पवार या दुसर्‍या ट्रॅक्टरचालकास अडचण निर्माण झाली. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले होते. या कारणावरून ग्यानसिंग विश्राम पवार, जगन ग्यानसिंग पवार, मगन ग्यानसिंग पवार व छगन ग्यानसिंग पवार या चौघांनी चरणसिंग यांच्यासह त्यांच्या आई धुपीबाई व काका अमनसिंग पवार यांना काठीने मारहाण केली होती. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्याची न्याय दंडाधिकारी आर.एल. राठोड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यात एकूण चार साक्षीदारांनी साक्ष दिल्या. दरम्यान, संशयित आरोपींविरुद्ध सबळ पुरावे न आल्यामुळे न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले; परंतु यातील साक्षीदार अमनसिंग ग्यानसिंग पवार याने न्यायालयात खोटी साक्ष दिल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अर्ज सरकारी वकील ए.के. शेख यांनी न्यायालयात सादर केला होता. या अनुषंगाने रावेर येथील न्यायालयाने त्याला खोटी साक्ष दिल्याबद्दल ५५० रूपयांचा दंड व कार्ट संपेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा ठोठावली. तर उर्वरित चारही संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Exit mobile version