Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खुशखबर : जिल्ह्यातील २१ रूग्ण कोरोनामुक्त; कोविड रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या २१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांनी या विषाणूवर मात केली असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. अमळनेरात सर्वाधीक कोरोना बाधीत आढळले असून या खालोखाल भुसावळ, पाचोरा, जळगाव, चोपडा आदी शहरांमध्येही याचा प्रादूर्भाव आढळून आला. तर अडावद सारख्या ग्रामीण भागातही याचे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, एकीकडे रूग्णांची तसेच मृतांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे बरे होणार्‍यांची संख्याही वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. आजवर दोन रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यात आज तब्बल २१ रूग्णांची भर पडली आहे.

आज कोविड रूग्णालयातून अमळनेरचे ९, भुसावळचे ७ तर जळगावचे ५ रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या सर्व रूग्णांचे १४ दिवसानंतरचे रूग्ण लागोपाठ दोन चाचण्यांमध्ये निगेटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे त्यांना कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. आज रात्री हे रूग्ण आपापल्या घरी रवाना झाले आहेत. दरम्यान, यामुळे कोरोनावर यशस्वीपणे मात करता येत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड हाॅस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित 172 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीमध्ये अमळनेर येथील 9, भुसावळ येथील 7, जळगाव येथील 5 व्यक्तींचा समावेश आहे. तर यापूर्वीच जळगाव व अमळनेर येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 23 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

येथील महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आवश्यक तो कालावधी पूर्ण झाल्याने तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसल्याने त्यांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील, डाॅ गायकवाड व त्यांची टीम उपस्थित होती.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, महानगरपालिकेचे आयुक्त सुजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज एकाच दिवशी जिल्ह्यातील 21 रुग्ण कोरोणामुक्त होऊन घरी परतले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या व्यक्तींना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली सात दिवस होम क्वांरटाईन ठेवण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डाॅ. खैरे यांनी सांगितले.

असे असले तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लाॅकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित राहावे, अनावश्यक गर्दी टाळावी. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ. उगले यांनी केले आहे

Exit mobile version