Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार राहूल शेवाळेंच्या विरोधात घोषणाबाजी ! : व्हिडीओ व्हायरल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले असता लोकांनी घोषणाबाजी करत त्यांना परत पाठविल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तर शेवाळे यांनी तसा प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनात याबाबत बातमी देण्यात आलेली आहे. यात म्हटले आहे की, चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार शेवाळे आले होते, परंतु त्यांना हजारो भीमसैनिकांनी गेटजवळच रोखून धरले. भीमसैनिकांनी शेवाळे यांना अक्षरश: हाकलून लावले. त्यांचा संताप पाहून शेवाळे यांना घाम फुटला. काही अनुचित घडण्यापूर्वीच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या घटनेच्या धास्तीने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या उद्यानातील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला असल्याचे या बातमीत नमूद करण्यात आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा हा दावा खासदार राहूल शेवाळे यांनी फेटाळून लावला आहे. या संदर्भात भूमिका स्पष्ट करतांना ते म्हणाले की, चेंबूरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ज्या ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ट्रॉलीमध्ये मी उभा होतो. त्यावेळी सुजात आंबेडकर यांच्या समर्थकांनी त्यांना आणि अमन आंबेडकर यांना ट्रॉलीमध्ये घेण्यासाठी आग्रह धरला. ट्रॉलीमध्ये माणसांची सख्या मर्यादित ठेवावी लागते, अन्यथा दुर्घटना होऊ शकते. त्यावेळी मी सुजात आंबेडकर यांना ट्रॉली मध्ये येण्यासाठी सांगितले आणि माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून मी स्वतः हुन ट्रॉली मधून खाली उतरलो. कोणीही मला खाली उतरण्यास सांगितले नव्हते.

Exit mobile version