Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार ब्रायनही पोलिसांच्या धक्काबुक्कीत कोसळले

 

हाथरस: वृत्तसंस्था । हाथरसच्या पीडित कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी पोलिसांच्या धक्काबुक्कीत कोसळ्यानंतर आज तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन हे देखील पोलिसांच्या धक्काबुक्कीत खाली कोसळले. टीमसीच्या खासदार ममता ठाकूर यांच्यासोबत देखील पोलिसांनी गैरवर्तणूक केली .
पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात असलेले तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना पोलिसांनी अडवले. मात्र, आपण पीडित कुटुंबीयांना भेटणारच यावर अडून राहिलेल्या डेरेक ओ ब्रायन यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. ते तोल जाऊन खाली कोसळले.

पोलिसांनी हाथरसमध्ये जाण्यास सर्वानाच मज्जाव केला असून नेते आणि प्रसारमाध्यमांना तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आज तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना रोखले.

टीमसीच्या खासदार ममता ठाकूर यांच्यासोबत देखील पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. आम्ही पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात होतो, मात्र आम्हाला परवानगी देण्यात आली नाही. आम्ही जाण्यासाठी जोर लावला तेव्हा पोलिसांनी आमचे ब्लाउज खेचले आणि आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळावर लाठीचार्ज केला, असे खासदार ममता ठाकूर म्हणाल्या. आपल्याला पुरूष पोलिस अधिकाऱ्यांनी देखील स्पर्श केला आणि हे लज्जास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या.

पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ हाथरसमध्ये दाखल झाले. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या या प्रतिनिधी मंडळात खासदार डेरेक ओ ब्रायन यांचा देखील समावेश आहे. तृणमूल काँग्रेसच्या या प्रतिनिधी मंडळाला पोलिसांनी गावाच्या बाहेरच रोखून धरले. संपूर्ण गावात पोलिसांचा कडक पहारा आहे.

आम्हाला दोघांना जाऊ द्या, आम्ही सर्व नियमांचे पालन करू, अशी विनंती तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पोलिसांना केली. मात्र, पोलिसांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यानंतर आम्ही पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जाणारच यावर हे प्रतिनिधी मंडळ ठाम राहिले. त्यात खासदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर झालेल्या धक्काबुक्कीत टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन तोल जाऊन खाली कोसळले.

Exit mobile version