Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मूक आंदोलनाची घोषणा

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था । आता समाज बोलणार नाही,  आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत   खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन छेडलं आहे.

 

मराठा आरक्षणावर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.  १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

 

कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मूक आंदोलन छेडत असल्याची माहिती दिली. १६ जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापूरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरु होईल. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचं. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.

 

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढणार असल्याचा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही पक्षासाठी नाही तर समाजासाठी आक्रमक भूमिका घेत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आता आक्रमक झालो आहोत, असंही ते म्हणाले.

 

संभाजीराजेंनी राजकारण्यांवरही घणाघाती टीका केली आहे. आपली व्होट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाही. पण मला ती काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. आता आपण डोकं लावून भूमिका घ्यायची असंही ते म्हणाले.

 

Exit mobile version