Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार उन्मेष पाटील यांनी घेतली महापालिकेत आढावा बैठक (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । आज महापालिकेच्या बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य, अतिक्रमण, एम. यू. ए. एन. विभागाची खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार स्मिता वाघ, चंदूभाई पटेल, सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, स्थायी सभापती शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बारी, आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.

बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी शहरात अमृतच्या संथ गतीने चालणाऱ्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. मक्तेदाराकडून एकाच कॉलनीत गल्ली सोडून पाईप लाईन केली जात असल्याचा आरोप केला. असा प्रकार घडल्यास नगरसेवकांनी त्याची माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. गुंठेवारी भागात देखील अमृतची पाईप लाईन टाकण्यात यावी अशी सूचना केली. अमृताच्या कामांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , मक्तेदार व मनपा प्रशासन या तिघांमध्ये ताळमेळ नसल्याचा आरोप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेने केलेल्या सर्वक्षणानुसार डीपीआर तयार केला असल्याचे सांगितले. अमृतुच्या कामांना प्रारंभ होऊन २ वर्ष झाले तरी काम केवळ ५० टक्केच झाल्याने खासदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. काम अपूर्ण असल्याने मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मक्तेदाराने आरोप प्रत्यारोप न करता समन्वयाने काम करावे अशी भूमिका मांडत डीपीआरमध्ये १२५ कॉलन्या सुटणे गंभीर असल्याचेही मत मांडले. यावर पर्याय काय असा प्रश्न आ. भोळे यांनी उपस्थित केला. तर आमदार पटेल यांनी जबाबदारीचे विकेंद्रीकरण करा अशी मागणी आ. पटेल यांनी केली. यावेळी मक्तेदाराच्या प्रतिनिधीनींनी त्यांच्या अडचणी मांडल्या. यावर आयुक्त कुलकर्णी यांनी तांत्रिक मंजुरीनंतर आक्षेप घेणे योग्य आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर तीन दिवसांनी स्वतंत्र बैठक बोलविण्याच्या सूचना खासदार पाटील याची दिल्यात. एम. यू. ए. एन. विभागातर्फे शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. या योजना राबवितांना नगरसेवकांना विश्वासात घेण्यात येत नसल्याचा आरोप केला. नगरसेवकांना विश्वासात घेऊन यापुढे काम करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. अतिक्रमण विभागातर्फे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी योग्यरित्या केली जात नसल्याची तक्रार फेरीवाल्यांनी केली. यावर फेरीवाला धोरण योग्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना खासदार पाटील यांनी केल्या. पंतप्रधान आवास योजना, भुयारी गटर, घनकचरा व्यवस्थापन आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

सभागृहात प्रवेशापूर्वी निर्जंतुकीकरण

खासदार उन्मेष पाटील यांनी मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात बोलविलेल्या बैठकीस हजर राहणाऱ्याचे सॅनिटायझर हात स्वच्छ करून सभागृहात प्रवेश देण्यात येत होता. खासदार पाटील यांना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सॅनिटायझर देऊन त्यांचे हात स्वच्छ करण्यात आले.

Exit mobile version