Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामगाव येथील सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खामगाव तहसीलतर्फे “आझादी के रंग खामगाव वासियोके संग ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्थानिक कोल्हटकर स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव होते तर प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, नायब तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार हेमंत पाटील, नायब तहसीलदार गजानन बोरले, गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांची मंचावर उपस्थिती होती. सर्वप्रथम सकाळी ११ वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. यामध्ये विविध स्थानिक लोककलावंत, शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गायन व नृत्य स्पर्धा पार पडल्या. तसेच मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमात शहरातील १२ शाळांचा समावेश होता तसेच स्थानिक लोक कलावंताचे १० कार्यक्रम पार पडले. शालेय विद्यार्थी व लोककलावंतांनी सादर केलेल्या बहारदार कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. सांस्कृतीक कार्यक्रमात सहभागी लोककलावंत व शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी केले तर आभार नायब तहसीलदार विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थीत होते.

Exit mobile version