खापरखेडा गाव निधी फाऊंडेशनने घेतले दत्तक!

 

जळगाव,प्रतिनिधी । आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहे. एकीकडे शहरी भागात महिला स्वतःच्या बळावर पुढे जात असल्या तरी ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी चित्र वेगळे आहे. आजही महिलांना पुढे जाण्यापासून रोखले जाते. आपल्या कुटुंबियांना शिक्षणाबाबत जागरूक करीत महिला, मुलींनी अबला नव्हे तर सबला म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन प्रगतीशील शेतकरी साहेबराव पाटील यांनी केले. तसेच निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून खापरखेडा गावातील महिलांची विचारधारा नक्की उंचावेल असेही ते म्हणाले.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि.२ रोजी निधी फाऊंडेशनतर्फे खापरखेडा गाव मासिक पाळी, कापडमुक्त अभियानासाठी दत्तक घेण्यात आले. निधी फाऊंडेशनतर्फे वर्षभर गावातील महिला, मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी साहेबराव पाटील, ग्रुप ग्रामपंचायत नांद्रा-खापरखेडाच्या सरपंच उषाबाई पाटील, पुंडलीक पाटील, भगवान पाटील, उपसरपंच सुरेखाबाई सोनवणे, राजू पाटील, अंगणवाडी सेविका प्रतिभा इंगळे, सूर्यकांत विसपुते आदी उपस्थित होते.

प्रस्तावना करताना वासुदेव सोनवणे यांनी सांगितले की, नांद्रा आणि खापरखेडा या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये माझे गाव, माझा विकास या तत्वानुसार गावाला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही गावात जातीपातीला थारा न देता उपक्रम राबविले जातात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या संस्थेने खापरखेडा गावासाठी पुढाकार घेतला ही अभिमानाची बाब आहे, असे नमूद केले. कार्यक्रमासाठी यश विसपुते, हेमंत लोहार, सनी चौधरी, स्वाती सोनगीरे आदींनी परिश्रम घेतले.

महिलांनी स्वच्छतेबाबत सजग रहावे : वैशाली विसपुते
निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी सांगितले की, कोणतेही कार्य एकाच दिवसात साध्य होत नाही आम्ही वर्षभर जनजागृती केल्यावर पोखरीतांडा गाव कापडमुक्त झाले. महिलांनी स्वतःच्या स्वच्छतेबाबत सजग रहायला हवे. मासिक पाळी हा शाप नव्हे तर निसर्गाने दिलेली देणगी आहे. भारताच्या दक्षिणेकडील भागात मुलीला मासिक पाळी आल्यावर सोहळा साजरा केला जातो. मासिक पाळीमुळे महिलांना आई होण्याचे वरदान लाभते. शहरी भागात मासिक पाळीबाबत महिला मोठ्याप्रमाणात जागरूक झाल्या आहेत तर ग्रामीण भागात हेच प्रमाण उलट आहे, म्हणून आम्ही ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. महिलांनी मासिक पाळीत कापड वापरणे सोडावे तर स्वच्छतेचा अवलंब करीत सॅनिटरी नॅपकिन वापरावे, असे आवाहन वैशाली विसपुते यांनी केले.

Protected Content