Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खान्देश सेंट्रल मैदानावर उद्योग उत्सव तथा आनंद मेळाव्याचे उद्घाटन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलांनी उद्योजक होण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी “उद्योग उत्सवा”चे नियमित आयोजन होणे महत्त्वाचे आहे. यामधून प्रगल्भ व कौशल्यपूर्ण महिला उद्योजक घडतील असे प्रतिपादन माजी आमदार मनीष जैन यांनी व्यक्त केले.

 

श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे उद्योग उत्सव २ तथा आनंद मेळा २०२२ हा ५ व ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या उद्योग उत्सवाचे उद्घाटन शनिवारी ५ मार्च रोजी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनीष जैन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक नितीन लढ्ढा, उद्योजक सुनील बाफना, सिद्धार्थ बाफना, अविनाश रायसोनी, रायसोनी इन्स्टिट्यूटचे प्रीतम रायसोनी, पराग बेदमुथा, राजेश जैन, अध्यक्ष आनंद चांदीवाल, सचिव विनय गांधी, कोषाध्यक्ष पारस कुचेरीया उपस्थित होते.

प्रस्तावनामधून प्रोजेक्ट चेअरमन रिकेश गांधी यांनी उद्योग उत्सव तथा आनंद मेळा याविषयी माहिती सांगितली. मान्यवरांनी फीत कापून उद्योग उत्सवाचे उद्घाटन केले. यानंतर माजी आ. मनीष जैन यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रवीण पगारिया यांनी तर आभार विनय गांधी यांनी मानले.

हा उद्योग उत्सव तथा आनंद मेळा खान्देश सेंट्रल मॉल मैदानावर होत असून नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. मेळ्याला प्रमुख प्रायोजक जी.एच.रायसोनी पब्लिक स्कुल तर सह प्रायोजक नेक्सा व हाऊस ऑफ ज्वेल्स आहेत. यावेळी जागतिक महिला दिन मंगळवारी येत असल्याने या मेळ्यामध्ये ८० टक्के सहभाग महिला विक्रेत्यांचा ठेवण्यात आला आहे.

नागरिकांनी उद्योग उत्सव तथा आनंद मेळ्यास उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन दीपा राका, स्वाती पगारिया, रिकेश गांधी, राहुल बांठिया यांनी केले आहे.

आनंद मेळ्यात…
यंदा उद्योग उत्सव तथा आनंद मेळ्यात महिलांची स्टॉल्स आहेत. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत विविध प्रकारचे कपडे, पादत्राणे, खाद्यपदार्थ, खेळणी, सौंदर्य प्रसाधने व इतर साहित्य आहे. तसेच विविध स्पर्धा देखील मुलांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये माझ्या आयुष्यातील रोल मॉडेल, सुदृढ बालक स्पर्धा, टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

Exit mobile version