Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खानदेशाला समृद्ध संस्कृतीचा वारसा – खा. सुप्रिया सुळे

धुळे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | समृद्ध, संस्कृतीचा मोठा वारसा असणाऱ्या खान्देशातील शिक्षण, आरोग्य,पाणी, रोजगार, वनसंवर्धन असे अनेक महत्त्वाचे प्रश्न व त्याविषयीच्या इथे असणाऱ्या समस्या वेदनादायी असल्याचे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले. शहरातील एस.एस.व्ही.पी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात लोकसंघर्ष मोर्चातर्फे खान्देशस्तरीय विचार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबून समाजातील प्रत्येक घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहून सत्तेत असेपर्यंत पुर्णपणे त्याचा पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न करू. यावेळी विचार मंचावर लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, डॉ.विजया अहिरराव, नंदा मावळे, सुवर्णा भदाणे,उषा पाटील, चैताली अमृतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात शेतीपूरक, पारंपारिक विविध बियाणांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. आजच्या घडीला शेती हा प्रचंड खर्चिक व भांडवली व्यवसायाचे रुप धारण करणारा विषय झाला आहे. शेतीसाठी आधुनिक उपकरणे,अनुकूल वातावरणाबरोबरच अन्नधन्य पिकण्यासाठी बीज बियाणांचे संवर्धन होणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतीची पध्दत अधिक समृद्ध व्हावी म्हणून पारंपरिकरित्या जतन केलेली बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन शेतीचे प्रतिक असलेल्या नांगराची पुजा आणि सृजनशीलतेचे प्रतीक असलेल्या रोपाला पाणी घालून करण्यात आले. प्रास्ताविकात सत्य,अहिंसेचा संदेश संपूर्ण जगाला देणारे गौतम बुद्ध, रयतेच राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले, बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचा वारसा लाभलेल्या आपल्या देशाचा विकास करताना केंद्रबिंदू असणारे गोरगरीब मजूर, महिला यांना मुख्य प्रवाहात आणून आपल्या संस्कृती व परंपरेची जतन करणारा माणूस ही महत्त्वाचा आहे. साने गुरुजी, बहिणाबाई यांचा विचारांचा समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या खान्देशचा विकास होणे महत्वाचे आहे असे मत लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे यांनी व्यक्त केले.

यंग फाऊंडेशनचे संदीप देवरे, वृषभ अहिरे यांनी क्रांतीगिते सादर केली. सुंत्रसंचालन जागृती बोरसे यांनी केले. यशस्वीतेसाठी संजय महाजन, सचिन धांडे, नितीन माने, आसिफ पटेल, भैय्या पाटील, प्रकाश बाविस्कर, प्रकाश पाटील, सचिन पाटील, पल्लवी पाटील, शिवानी मराठे, रोहित येवले, चेतन उपाध्याय, विशाल वानखेडे, मनिष पाटील, किर्तीवर्धन पानपाटील, ईश्वर वाघ, गौतम बोराळे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमात खान्देशस्तरीय बुद्धीजीवी संघटना,सामाजिक संस्था/संघटना पदाधिकारी,कार्यकर्ते, परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संवाद सभेत यांनी मांडले मुद्दे –
स्मिता देशमुख यांनी – समृद्ध शेती, संजय महाजन – वनसंवर्धन, प्रकाश पाटील/वृषभ अहिरे- शिक्षण, बापु हटकर – स्थंलातर, प्रकाश बाविस्कर, डॉ. विजया अहिरराव – आरोग्य, प्रा. शरद पाटील, सुरेश सोनवणे, रणजित शिंदे, गोपाल पाटील – विकास, रोजगार – प्रतिभाताई शिंदे, विनोद पाटील – दारूबंदी आदी विषयांवर अभ्यासपुर्ण प्रश्न मांडले.

Exit mobile version