खाण व खनिज विकास आणि नियमन विधेयकामुळे देशात मोठ्या रोजगारवाढीची शक्यता

 

नवी दिल्ली:  वृत्तसंस्था  । मोदी सरकारने मंजूर केलेल्या खाण व खनिज विकास आणि नियमन विधेयकामुळे  देशात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी काळात खाणक्षेत्रात आमुलाग्र बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

गेल्याच महिन्यात संसदेत या विधेयकाला मंजुरी मिळाली होती.

 

या विधेयकामुळे देशातील खनिकर्म क्षेत्रात नव्या सुधारणांना चालना मिळेल. यामुळे खनिज उत्पादन वाढण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही होणार आहे.  खनिकर्म क्षेत्रात देशभरात तब्बल 55 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोरोना संकटामुळे देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले असताना ही बाब आशादायक मानली जात आहे. उत्पादन वाढल्यामुळे सरकारच्या महसुलातही मोठी भर पडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

 

भारतात खनिजांचा मोठा साठा आहे. मात्र, त्यापैकी केवळ 45 टक्के साठ्याचाच वापर होत आहे. परिणामी भारताला खनिजांची आयत करावी लागते. मात्र, नव्या नियमांमुळे ही आयात कमी होऊ शकते. तसेच या माध्यमातून सरकारला मिळालेल्या महसूलाचा वापर संबंधित राज्यांच्या विकासासाठी केला जाईल, असे आश्वासनही प्रल्हाद जोशी यांनी दिले.

 

 

या कायद्यामुळे खाणींच्या कामात सुटसुटीतपणा येईल आणि खनिजांच्या उत्पादनात वाढ होऊन नवा विक्रम होईल. या कायद्यातील तरतुदींमुळे कायदेशीर अडथळे दूर होऊन लिलावासाठी मोठ्या प्रमाणात खाणी उपलब्ध होतील. त्यामुळे देशाच्या खनिज उत्पादनात वाढ होईल.

 

या कायद्याने खाण मालकांना खनिजं खुल्या बाजारात विकण्याचाही मार्ग मोकळा केलाय. त्या त्या खाणीशी संबंधित प्रकल्पाची गरज पूर्ण झाल्यानंतर खाणीतील 50 टक्क्यांपर्यतची खनिजं खुल्या बाजारात विकण्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

 

या कायद्यामुळे केंद्र सरकारचे खाणींच्या लिलाव करण्याचे अधिकार वाढले आहेत. “राज्य सरकार ज्या ठिकाणी खाणींचे लिलाव करु शकणार नाही त्या ठिकाणी केंद्र सरकार खाणींच्या लिलावाची प्रक्रिया पार पाडेल.  या खाणींचं उत्पन्न राज्य सरकारांनाच देण्यात येईल,” असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलंय.

Protected Content