खाजगी प्राथमिक शाळा कर्मचाऱ्यांना वेतनानंद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेपू्र्वाच विनाअडथळा वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने खाजगी प्राथमिक शाळा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर उमटली आहे.

शिक्षण आयुक्त उपसंचालक कार्यालय प्राथमिक शिक्षण विभाग वेतन पथक प्राथमिक, कोषागार कार्यालय आणि एसबीआय बँकेच्या संयुक्त प्रयत्नांतून सेवा हमी कायद्याचे तंतोतंत पालन करण्यात अभुतपूर्व यश मिळाले आहे त्यामुळे जुलै महिन्याचे वेतन एक तारखेपूर्वीच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या अकाऊंटला जमा करण्यात आले आहे

जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला होण्याची मागणी सतत मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने करण्यात येत होती. शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांनी सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्याने या योजनेला गती मिळाली आहे.

कर्मचाऱ्यांची खातेनिहाय माहितीतील त्रुटी पूर्तता करण्यात वेतन पथक प्राथमिक व एसबीआय बॅंकेतर्फे प्राधान्य क्रम निश्चित करण्यात आला आहे आता यापुढे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर थेट वेतन अदा करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे

शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे नाशिक विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील वेतन पथक अधीक्षक आर. बी. संदांनशिवे, जिल्हा कोषागार अधिकारी आणि एसबीआय बॅंकेचे अधिकारी यांनी वेतन अदा करण्याच्या प्रक्रियेचा कृती कार्यक्रम निश्चित करून वेगवान हालचाली केल्याने जुलै महिन्याचे वेतन संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आले पहिल्यादाच वेळेआधी वेतन झाल्यामुळे खाजगी प्राथमिक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कर्मचाऱ्यांना दरमहा एक तारखेला वेतन अदा करण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वास येत आहे. विना अडथळा कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार असल्याने एक चांगली योजना लागू झाली असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले.

एक तारखेलाच संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन अदा करणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. वरिष्ठ शिक्षण अधिकारी वेतन पथक कर्मचारी व खाजगी प्राथमिक संघटनेच्या सकारात्मतेमुळे हे उद्दिष्ट साध्य करता आले असल्याचे जळगाव प्राथमिक वेतन पथक अधिक्षक आर. बी. संदांनशिवे यांनी सांगितले.

Protected Content