Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘खाकी’वर हात टाकणार्‍यांची पहूरमधून निघाली धिंड !

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील बस स्थानक परिसरात पोलिसांवर हल्ला करणार्‍या गुंडांची आज सकाळी शहरातून धिंड काढण्यात आली.

या संदर्भातील वृत्त असे की, १४ जानेवारी रोजी पहूर येथील पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे कर्तव्य बजावत असताना पहूर बस स्थानकावर फिरोज शेख सुपडू शेख व त्याचा साथीदार खाजा तडवी यांची दुचाकी रस्त्यावर उभी असल्यामुळे दुचाकी बाजूला घे असे बोलल्याचा राग आल्यामुळे दोघांनी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना मारहाण करून डोक्याला व हाताला जबर मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्या दिवसापासून आरोपी फिरोज शेख सुपडू शेख व खाजा तडवी हे फरार होते.

दरम्यान, गेल्या पाच दिवसापासून तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे त्यांच्या मागावर होते.मोबाईलचे तांत्रिक लोकेशन वरून आरोपी यांचा मार्ग काढून काल रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास परभणी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर एका जंगलामध्ये लपलेल्या आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर कोकणे हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेले असता त्यांनी पोलिसांवरच दगडफेक करून पोलिसांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्यांना पकडले असता आरोपी खाजा तडवी याने या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांची रिवाल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठ्या हिमतीने दोघांना पकडण्यात यश मिळविले.

दरम्यान, आज दोन्ही आरोपींची सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातून धिंड काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक चौकापासून त्यांना फटके मारत पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बघ्यांची तोबा गर्दी झाली होती यामुळे जणू काही रस्त्याला यात्रेची स्वरूप झाले होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुंडगिरी करणार्‍यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.

Exit mobile version