Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खळबळजनक : अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तरूणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानक परिसरात असलेले अतिक्रमण काढण्यात याव्या, या मागणीसाठी तक्रारदार यांनी  पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रेाल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळण्यात यश आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारदार भूषण नामदेव पाटील, स्वप्निल प्रल्हाद पाटील, चेतन रवींद्र पाटील आणि जीवन प्रभाकर चव्हाण सर्व रा. कजगाव ता. भडगाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज केलेले आहे. अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, यासंदर्भात यापूर्वी या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी देखील खोटे आश्वासने देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.

 

काही दिवसातच पावसाळा सुरू होत आहे, शिवाय कजगाव गाव हे मध्यवर्ती ठिकाण असून गावाची लोकसंख्या १५ ते २० हजार पर्यंत आहे. या गावाला लागून  २५ खेडी असून कजगाव येथे रेल्वे स्टेशन आहे. शिवाय जळगाव ते मनमाड राष्ट्रीय महामार्गावर कजगाव येथे केळीची मोठी बाजारपेठ आहे आणि बसस्थानक परिसरात अतिक्रमण असल्याने नागरिकांना बसण्यास व उभे राहण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे, शिवाय बसस्थानक येथे बस थांबत नसल्याने बसमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना महामार्गावर जावे लागते, त्यामुळे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी केली असताना देखील प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. अखेर या तरुणांनी मंगळवारी २३ मे रोजी दुपारी १  वाजता पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रेाल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी वेळीच दाखल झाल्यामुळे प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला आहे. या आत्मदहन करण्याचा प्रयत्नामुळे पाचोरा शहरात एकच कळबळ उडाली होती. आत्मदहन करणाऱ्या तरुणांवर पुढील कारवाई सुरू आहे.

Exit mobile version