Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसेंच्या प्रवेशाबद्दल विचारताच अजितदादांनी जोडले हात !

सोलापुर वृत्तसंस्था । सोलापूर येथे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत विचारताच त्यांनी आज चक्क पत्रकारांनाच हात जोडले.

याबाबत वृत्त असे की, भाजपचे मातब्बर नेते एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कालच रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आले असता त्यांनी एकनाथराव खडसे सोबत गुप्त चर्चा केल्याचे दिसून आले. यामुळे एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकारांनी एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील आगमन याबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी ‘आपल्याला प्रवेशाबाबत काही माहिती नाही आणि ज्या गोष्टीची मला माहिती नाही, त्याबद्दल मी तुम्हाला काय सांगणार ?’ असे सांगत चक्क पत्रकारांना हात जोडून नमस्कार केला. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

याप्रसंगी अजितदादा पवार म्हणाले की, ‘राजकीय जीवनामध्ये अनेकदा विरोधी पक्षाचे नेते हे आम्हाला भेटत असतात. त्यामुळे कुणी कोणत्या पक्षांमध्ये जाणार असा निष्कर्ष काढता येत नाही’. दरम्यान कालच एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेश याबाबत संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले असताना आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जोडलेले हात याबाबत राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version