Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 जळगाव प्रतिनिधी । जिल्हा नियोजन समिती यांच्यातर्फे अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत क्रीडांगण विकासासाठी अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पात्र अनुसूचित जाती संवर्गासाठी कार्यरत सर्व शासकीय, संस्था संचलित अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे आदींनी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर करावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

या योजनेंतर्गत फक्त अनुसूचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था संचलित अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे, अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादींना त्यांच्या क्षेत्रातील अनुसूचित जाती वस्ती, वाडी या ठिकाणी अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल. त्यासाठी ज्या अनुदा‍नित शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे यांच्याकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास 1.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा विहित खेळांचे मैदान तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतील.

या  योजनेअंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मीटर अथवा 400 मीटर धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतींचे / तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगण तयार करणे, प्रसाधन गृह/ चेजिंग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाइटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहीत्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा / सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी / आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी  / आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रींकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलिंगसाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबीसाठी क्रीडा उपक्रमांची आवश्यकता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येते.

या बाबींपैकी (प्रस्ताव एकाच बाबींकरिता करावा) अंदाजीत खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल रुपये सात लाखांपर्यंतचे अनुदान यापैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. मात्र क्रीडा साहित्यासाठी कमाल रु 3 लाख अनुदान मर्यादा राहील. क्रीडा साहीत्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा, महाविद्यालय, वस्तीगृहे यांच्याकडे सदर मैदाने, हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.

या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2020-21 या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदर योजनेचा लाभ / फायदा घेवू इच्छिणाऱ्या फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय / संस्था संचलित अनुदानीत शाळा / कनिष्ठ महाविद्यालये / वस्तीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने / समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करणे संदर्भात अर्जाचा विहीत नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे 31 डिसेंबर, 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधून त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव हा ऑन लाईन व्दारे jalgaonsports.in या संकेतस्थळावर अपलोड करुन व अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मूळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे मूळ दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत, विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दीक्षित यांनी म्हटले आहे.

Exit mobile version