Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौशल्यावर आधारित शिक्षणाशिवाय पर्याय नाही – प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर

जळगाव प्रतिनिधी । ‘नई तालीम’ या विषयावर महात्मा गांधी ग्रामीण शिक्षण परिषद आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संयुक्त आयोजित ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी कौशल्यावर आधारित शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी केले.

प्र-कुलगुरू प्राध्यापक पी पी माहुलीकर यांनी कौशल्य शिक्षण क्षमताधिष्ठित शिक्षणातून लोकल टू ग्लोबल आणि होकल ते लोकल विकास करण्यासाठी विविध कौशल्य विकसित करून व्यावसायिक शिक्षणाचा विकास करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये समाविष्ट केलेले विविध शिक्षणक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. एकत्रित व्यावसायिक शिक्षणावर त्यांनी भर दिला स्वस्थ भारत स्वच्छ भारत, महिला सबलीकरण, फिट इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या घटकांचा समावेश नवीन शैक्षणिक धोरणात केलेला आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले या कार्यशाळेचे कामकाज परिषदेच्या समन्वयक प्रा.मनीषा करपे नवी दिल्ली आणि विद्यापीठातील आंतर विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रा. अशोक राणे यांनी विद्यापीठाच्या सहकार्याने केले.

या कार्यशाळेत व्यवसायिक शिक्षण, आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत, सार्वजनिक आरोग्य इत्यादी उपक्रमांवर आधारित चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत विविध अभ्यास मडळाचे अध्यक्ष, सदस्य आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील शिक्षकांनी सहभाग घेतला. विविध कौशल्य विकसित करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातून व्यवसायिक शिक्षणाची सुविधा आणि उपक्रम यांचे यशस्वी आयोजन केले पाहिजे असे प्रतिपादन प्रभारी अधिष्ठाता प्रा. अशोक राणे यांनी केले. या कार्यशाळेला प्राध्यापक मनिषा करपे आणि प्राध्यापिका योगिता मांडोळे यांनी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांनी कृतिशील सहभाग घेऊन आपल्या या नवनवीन संकल्पना विशद केल्यात.

Exit mobile version