Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौमार्य चाचणीवर बंदी ! : सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

 

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने आज शारीरीक शोषणाच्या प्रकरणात करण्यात येणार्‍या कौमार्य चाचणीवर बंदी घालण्याचा महत्वाचा निकाल दिला आहे.

महिलांवर होणार्‍या शारीरीक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कौमार्य चाचणी अर्थात टू-फिंगर टेस्ट घेण्यात येते. यावर बंदी घालण्यात यावी अशी कधीपासूनच मागणी करण्यात येत होती. बलात्काराबाबतच्या एका खटल्यात सुप्रीम कोर्टाने याबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील खटल्याची सुनावणी ही न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर पार पडली.

याचा निकाल देतांना न्यायमूर्ती म्हणाले की, या न्यायालयाने वारंवार बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात कौमार्य चाचणी करण्यास नकार दिला आहे. या चाचणीला कोणताही आधार नाही. याउलट पीडित महिलेवर पुन्हा अत्याचार कऱण्यासारखं असून, तिला अजून एक मानसिक धक्का देण्यासारखं आहे. ही चाचणी घेतली जाऊ नये. लैंगिकदृष्ट्या सक्रीय स्त्रियांवर बलात्कार केला जाऊ शकत नाही या चुकीच्या आधारावर ही चाचणी केली जात आहे. पण सत्यापेक्षा मोठं काही नाही, असं निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

न्यायमूर्तींनी यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला बलात्कार आणि लैंगिक शोषणातील पीडितांची कौमार्य चाचणी घेतली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसंच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या गाईडलाइन्स सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये पाठवण्याचा आदेश दिला आहे. पीडित महिलांची योग्य चाचणी व्हावी यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचं वर्कशॉप घेण्याचीही सूचना केली. तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमांची चाचपणी करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन बलात्कार किंवा लैंगिक शोषण पीडित महिलांची तपासणी करताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही.

Exit mobile version