कोसला फाउंडेशनतर्फे जळगावात ‘कला संजीवनी’ चित्रप्रदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कलेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा देणारा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. कोसला फाउण्डेशनच्या माध्यमातून थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांच्या ‘कला संजीवनी’ चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. राधेश्याम चौधरी आणि डाएटचे माजी प्राचार्य नीळकण्ठ गायकवाड, चोपडा येथील कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन उपस्थित होते.

 

थॅलेसेमिया रुग्णांवर कोसला फाउण्डेशनच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून देणा-या डॉ.सई नेमाडे यांच्या सोबत आपण सर्वांनी या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या कामात लक्ष घातले पाहिजे असे अशोक जैन यांनी सांगितले.पंधरा वर्षापूर्वी एका थॅलेसेमिया ग्रस्त व्यक्तीसाठी सर्वांनी मिळून काही एकत्रितपणे प्रयत्न केल्याची आठवण त्यांनी सांगितली.
जळगाव शहरात-जिल्ह्यात कोसला फाउण्डेशनच्या माध्यमातून ‘थॅलेसेमिया’ विषयात प्रख्यात डॉक्टर आणि संबंधित अत्याधुनिक यंत्रणा आता उपलब्ध असल्याने वेळच्यावेळी तपासणी आणि उपचार या प्रक्रियेत कुठेही,कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये यासाठी भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउण्डेशन,कांताई नेत्रालय तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या सहकार्याने या कार्यासाठी भविष्यात निश्चितच सहकार्य केले जाणार आहे.लवकरच एका कृतिकार्यक्रमाची रूपरेषा ठरवून या कामाला गती देण्याचे आश्वासन अशोक जैन यांनी दिले.चिमुकल्यांनी blood transfusion सुरू असताना तन्मयतेने चित्रं काढल्याबद्दल थॅलेसेमिया ग्रस्त चिमुकल्यांच्या चित्रांचे त्यांनी आवर्जून कौतुकही केले.कलेच्या सान्निध्यात मनावरचा ताण कमी होऊन चांगल्या कामाशी एकाग्रतेने जोडले जाणे ही खरी जीवन संजीवनी असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ.राधेश्याम चौधरी यांनी आणि प्राचार्य नीळकण्ठ गायकवाड यांनीही कलेतून विद्यार्थी कसे अभिव्यक्त होतात याविषयी काही दृष्टांत-दाखले देऊन मार्गदर्शन केले.प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी चिमुकल्यांच्या भावविश्वातील सुंदर कलेला प्रोत्साहन देणा-या डॉ.सई नेमाडे यांच्या ‌परिश्रमाविषयी आदर भावना व्यक्त केल्या.

कोसला फाउण्डेशनच्या कामाची प्रशंसा केली आणि या चिमुकल्यांसाठी आम्ही कलावंत आमचा वेळ देणार आहोत,त्यांच्या आयुष्यातील आशेची पणती तेवती ठेवण्याचे काम आपल्या सर्वांचे असल्याचे सांगून सहकार्याचे अभिवचन दिले.व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थित राजू बाविस्कर,जितेंद्र सुरळकर,सचिन मुसळे,विजय जैन या कलावंतांच्या शुभहस्ते प्रदर्शनीत सहभागी विद्यार्थ्यांचा गिफ्ट देऊन स्नेहपूर्वक गौरव करण्यात आला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना तुळशीचे रोप आदरपूर्वक भेट देण्यात आले.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सई नेमाडे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
भारतात आणि परदेशात विज्ञानाने सिद्ध केले आहे की संगीत आणि कला यामुळे सकारात्मकता वाढते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. विशेषतः ज्या आजारांवर औषधे घेत असतो त्याचा परिणामदेखील अधिक चांगल्या पद्धतीने होतो.पालकांनी त्यांनी नमूद केले. युरोप येथील एका चित्र स्पर्धेसाठी या प्रदर्शनातील चित्रं पाठवली जाणार असल्याची माहिती डॉ.सई नेमाडे यांनी दिली.
‘कला संजीवनी’ चित्र प्रदर्शनीत थॅलेसेमिया ग्रस्त चिमुकल्यांची 40 चित्रं प्रदर्शित झाली असून ही प्रदर्शनी ‘भाऊंचे उद्यान’ येथील वानखेडे कला दालनात दहा तारखेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली.जास्तीतजास्त रसिकांनी या प्रदर्शनीला भेट द्यावी हे विनम्र निवेदन डॉ.सई नेमाडे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केशव स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले.

Protected Content