कोविशील्ड नावासाठी सीरम इन्स्टिट्यूटवर नांदेडच्या कम्पनीचा खटला

पुणे : वृत्तसंस्था । क्युटिस बायोटेक या नांदेड येथील औषध कंपनीने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया विरोधात पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात खटला दाखल केला आहे.

सीरमने कोरोना व्हायरसविरोधात बनवलेल्या लसीला ‘कोव्हिशिल्ड’ असे नाव दिले आहे. सीरमने त्यांच्या लसीसाठी ‘कोव्हिशिल्ड’ या नावाचा वापर करु नये, यासाठी क्युटिस बायोटेकने हा खटला दाखल केला आहे.

‘कोव्हिशिल्ड’ या नावाच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी आम्ही आधीच एप्रिल २०२० मध्ये अर्ज केला होता. ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने कंपनीने वेगवेगळया उत्पादनांची निर्मिती करुन, बाजारात त्यांची विक्री केली आहे असे क्युटिस बायोटेकने म्हटले आहे.

सध्या देशात सर्वांचेच लक्ष सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीकडे लागले आहे. सीरम ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या लसीचे उत्पादन करीत आहे. सीरमने या कोरोना प्रतिबंधक लसीला ‘कोव्हिशिल्ड’ हे नाव दिले आहे.

अलीकडेच सरकारने सीरमच्या लसीचा मर्यादीत वापर करण्यास आप्तकालीन मान्यता दिली आहे. ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे काही कोटी डोस बनून तयार आहेत. पुढच्या दहा दिवसात लसीकरणाला देशात सुरुवात होईल. या परिस्थितीत आता नांदेडमधील क्युटिस बायोटेक औषध कंपनीने सीरम विरोधात कोर्टात खटला दाखल केला आहे.

Protected Content