Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोविड काळात साडे बारा कोटींचा गैरव्यवहार : मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे कोरोनाने माणसे मरत असतांना दुसरीकडे पैसे खाणे सुरू होते अशी टिका करत कोविड काळात राज्यात साडेबारा हजार कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

 

गेल्या दोन दिवसांपासून ईडीने कोविड गैरव्यवहार प्रकरणी छापे टाकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यावर भाष्य करतांना उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले की, ईडीकडून सुरु असलेल्या कथित कोविड घोटाळ्याच्या चौकशीवर मी बोलू इच्छित नाही. जे काही निघेल ते चौकशीतून समोर येईल. कोविड सारखा भयंकर आजार होता. इकडे माणसं मरत होते. तर दुसरीकडे लोकं पैसे खात होते. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हे चांगलं आहे? मृतदेहांच्या बॅगची किंमत तुम्ही ५०० ते ६०० रुपयांवरुन थेट ५ हजार ते ६ हजार लावत असाल, यापेक्षा दुसरं मोठं पाप काय असू शकेल? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, जनतेचा पैसा आहे. तो जनतेच्या कामांसाठीच वापरला गेला पाहिजे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चांगले रस्ते, दिवा, पाणी, स्वच्छता, आरोग्य या मुलभूत सोयीसुविधा मुंबईकरांना मिळायला पाहिजे होत्या. त्यापासून वंचित ठेवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना हिशोब द्यावा लागेल असा इशारा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिला.

Exit mobile version