कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – पालकमंत्री (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  कधी काळी जळगाव जिल्ह्यातील संसर्गाचा दर हा देशात सर्वाधीक असतांना सर्वांच्या सहकार्याने आता आपला दर सर्वात कमी झालेला आहे. आपण दुसर्‍या लाटेचा प्रतिकार यशस्वीपणे केला असून तिसरी लाट आलीच तर याच्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. मोहाडी येथील महिला रूग्णालयात ऑक्सीजन प्लांटचे भूमिपुजन केल्यानंतर ते बोलत होते. याच कार्यक्रमात हॉस्पीटलला १०० ऑक्सीजन कॉन्सनट्रेटरची भेट देण्यात आली असून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तर कोरोना योध्द्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

 

मध्यंतरी कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मोहाडी येथील महिला महाविद्यालयात अतिरिक्त बेडची व्यवस्था केली होती. अतिशय प्रशस्त जागेत उभारलेल्या या हॉस्पीटलने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा यशस्वी प्रतिकार करण्यात अतिशय मोलाची भूमिका पार पाडली आहे. दरम्यान, हे हॉस्पीटल ऑक्सीजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी येथे ऑक्सीजन निर्मिती प्लांट उभारण्यात येत असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते याचे भूमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी नूतन जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, सिव्हील सर्जन नागोजीराव चव्हाण, सा.बा.चे कार्यकारी अभियंता राजपूत, उपअभियंता श्रेणी 1 सुभाष राऊत, जि. प. सदस्य पवन सोनवणे यांची उपस्थिती होती. ऑक्सीजन निर्मिती करणारा प्लांट कार्यरत होण्याआधी येथे प्राणवायूसाठी हवेतून ऑक्सीजन निर्मिती करणार्‍या उपकरणांची भेट देण्यात आली आहे. यासाठी हॉस्पीटला पालकमंत्र्यांच्या हस्ते तब्बल १०० ऑक्सीजन कॉन्सनट्रेटरची भेट देण्यात आली. तर याप्रसंगी पालकमंत्र्यांनी कोरोनाच्या प्रतिकारात अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणारे येथील कोविड योध्दे म्हणजेच हॉस्पीटलमधील कर्मचार्‍यांचा सत्कार केला.

 

 

या संदर्भात माहिती देतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा यशस्वी प्रतिकार केला असून तिसरी लाट आल्यास याचाही आपण याच पध्दतीत मुकाबला करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. यात जिल्हाधिकार्‍यांपासून ते अगदी सफाई कर्मचार्‍यांचे एकत्रीत प्रयत्न आहेत. जि.प. सीइओ, डीन, सिव्हील सर्जन, अरोग्याधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नातून ही बाब शक्य झालेली आहे. तिसरी लाट केव्हा येणार हे माहित नसले तरी जिल्हा प्रशासन याचा यशस्वीपणे प्रतिकार करणार असल्याचा आत्मविश्‍वास पालकमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/217014950079973

 

Protected Content