Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोविडची लस घेणारा बनतो ‘बाहुबली’ : मोदी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | कोविडची लस ही बाहूमध्ये घेतली जाते, अर्थात ही लस घेणारा ‘बाहुबली’ बनत असून देशात आजवर ४० कोटी नागरिक बाहुबली बनले आहेत. ते कोरोनाच्या प्रतिकारात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन आज पंतप्रधान मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

आज पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही करोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. लस ही हातावर(बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. करोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आता पर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल, असे मोदींनी म्हटलं.

कोरोनाने सर्व जगावर आणि मानवजातीवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे या महामारीवर संसदेत चर्चा व्हायला हवी आणि या मुद्यावर प्राथमिकपणे चर्चा करायला हवी. तसेच सर्व सदस्यांकडून यावरील सूचना सूचना मिळाव्यात, जेणेकरून कोविडविरूद्ध लढा देण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल आणि उणीवा दूर होऊन एकत्रित वाटचाल करु. मी सर्व खासदारांना आणि सर्व पक्षांना सभागृहात अत्यंत कठीण आणि तीव्र प्रश्न उपस्थित करण्याची विनंती करतो. पण त्याचसोबत उत्तर देण्यासाठी सरकारला शिस्तबद्ध वातावरणात वेळ द्यावा. यामुळे लोकशाहीला चालना मिळेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही बळकट होईल असे पंतप्रधान म्हणाले.

Exit mobile version