Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोल्हापूर झेडपीत कोरोना साहित्य खरेदी घोटाळा!; चौकशीची मागणी

कोल्हापूर वृत्तसंस्था । कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदने केलेल्या साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळ्याचा आरोप भाजपने केला आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच अन्य आवश्यक साहित्य चढ्या दराने खरेदी करुन यंत्रणेतील लोकांनी मोठा डल्ला मारल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्येने आता 16 हजारांचा टप्पा ओलांडला असून कोरोना बळींची संख्या देखील 500 पर्यंत जाऊन पोहचली आहे. एका बाजूला जिल्ह्यात अशी गंभीर स्थिती असताना जिल्हा परिषदेने कोरोना काळात केलेली साहित्य खरेदी चर्चेचा विषय बनली आहे. कारण, या साहित्य खरेदी 30 ते 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी भाजपच्या सदस्यांनी केला आहे.

साहित्य खरेदी करणाऱ्या यंत्रणेतील लोकांनी काही ठराविक लोकांना हाताशी धरुन हा ढपला पडल्याचं भाजप सदस्यांच म्हणणं आहे. विरोधकांचा हाच आरोप काल झालेल्या सर्वसाधारण सभेच्यावेळी कळीचा मुद्दा बनला. विरोधकांना सभागृहात यायला मज्जाव केल्याने भाजप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात बाहेरच निषेध व्यक्त केला. कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, पल्स ऑक्सिमिटर, व्हेंटिलेटर असंच सगळं साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचा आरोप करत याची कॅग मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी महाविकास आघाडी न मात्र भाजप आणि मित्र पक्षांना केलेल्या या आरोपांचं खंडन केलं आहे. कोणतीही खरेदी बेकायदेशीर किंवा चढ्या दराने केले नसल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. इतकंच नाही, तर विरोधकांकडून होणारे आरोप सिद्ध झाल्यास पदांचा राजीनामा देण्याची तयारी ही या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. या सगळ्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी भाजप आणि मित्रपक्षांनी लावून धरल्याने ऐन कोरोना रुग्ण वाढीच्या काळात जिल्हा परिषदेतील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Exit mobile version