कोल्हापूरमध्ये दहा दिवसांचा कडक लॉकडाउन

 

 

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था । सातारा जिल्ह्यात आणि बारामतीमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर आज सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.

 

 

वेगानं वाढलेली रुग्णसंख्या व आरोग्य सुविधांवर पडलेला ताण आणि बेड, ऑक्सिजन, औषधींचा तुटवडा यामुळे राज्यात आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाउन निर्णय घेतले जात आहे.

 

 

रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि प्रसार नियंत्रित व्हावा, यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम विषाणू प्रसाराला आळा घालण्यावर होत नसल्याचं चित्र आहे. राज्यातील रुग्णावाढीचा आलेख कायम असून, ५० ते ६० हजारांच्या दरम्यान राज्यात रुग्णवाढ होत आहे. यात काही जिल्ह्यांतील परिस्थिती अजून चिंताजनक आहे.

 

जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कडक लॉकडाउन करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहे. सोमवारी  सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज कोल्हापूरमध्ये दहा दिवसांचा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी माहिती दिली. काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये  रुग्ण वाढत आहेत. गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली, तरी पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला नाही. सध्या जिल्ह्यातील २४०० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.   ५ मे पासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे.  १५ मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

 

कोल्हापूर जिल्ह्यात  रूग्णसंख्या वाढत असून  ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरची कमतरता  आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी    तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके हे या बैठकीला उपस्थित होते.

Protected Content