Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोल्हापुरात महावितरणला टाळे

 

कोल्हापूर: वृत्तसंस्था । लाकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ करावीत या मागणीसाठी कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाला संतप्त ग्राहकांनी गनिमीकाव्याने टाळे ठोकले.

चार तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले. दरम्यान, दिवाळीपूर्वी सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली ग्राहक एकवटले असून वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी आज दुपारी बारा वाजता टाळे ठोका आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण, कार्यालय सुरू झाल्यानंतर हे आंदोलन केल्यास त्याची तीव्रता कमी होईल म्हणून अचानक आंदोलनाची वेळ बदलून सकाळी नऊ वाजताच महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. यावेळी पोलिसानी आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली.

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर इतर कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. जोपर्यंत कार्यकर्त्यांना सोडणार नाही, तोपर्यंत गाडी सोडणार नाही म्हणत त्यांनी गाडी समोरच आंदोलन सुरू केले. यामुळे पोलिसांनी आंदोलकांची मुक्तता केली. पोलिसांनी सोडल्यानंतर पुन्हा एकदा महावितरण कार्यालयासमोर येऊन कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत रोखण्यात येऊ लागले.

 

पोलिसांनी टाळे तोडण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर पुन्हा पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट सुरू झाली. चार तास हे आंदोलन सुरू होते. यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. चारही बाजूने कार्यालयाची नाकाबंदी केल्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाता आले नाही. त्यामुळे कामकाज बंद पडले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रताप होगाडे, बाबा पार्टे, आर. के. पोवार, विक्रांत पाटील, अशोक पवार, रमेश मोरे यांनी केले.

वीज बिलांचा प्रश्न खूपच गंभीर बनत चालला आहे. लॉकडाऊन काळात भरमसाठ रकमेची वीज बिलं आकारण्यात आल्याने ग्राहकांना मोठा हादरा बसला आहे. वीजवापर कमी असतानाही असंख्य ग्राहकांना सरसकट बिले आकारण्यात आली आहेत.  महावितरणकडून कोणतेच समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोल्हापुरात सातत्याने हा प्रश्न ऐरणीवर आणण्यात येत असून आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून महावितरणला मोठा झटका देण्यात आला आहे.

Exit mobile version