Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना संकटात कंत्राटी, तात्पुरत्या कामगारांचे वेतन कापू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सर्व कामगार उपायुक्त, सहायक आयुक्त, कामगार अधिकारी यांना त्यांच्या अखत्यारीतील माथाडींसह सर्व खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी कोणत्याही तात्पुरत्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढून टाकू नये किंवा त्यांच्या वेतनात कपात करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

कोरोनाचे संकट मोठे असून त्याचा सर्वांनी मिळून मुकाबला करायचा आहे. रोगाचे संक्रमण पूर्णत: बंद करण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणी लोकांनी येऊ नये तसेच घरीच राहावे असे आवाहन केले आहे, त्याचा फटका दैनंदिन रोजीरोटी कमावणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना बसू नये व त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून राज्याच्या कामगार विभागाने तशी विनंती सर्व कारखाने व व्यवसायांना केली आहे.

सर्व आस्थापनांनी, कंपन्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीत शासनास सहकार्य करावे तसेच एखाद्या कर्मचाऱ्याने या कालावधीत रजा घेतली असल्यास त्याचे वेतन कापू नये अशी विनंतीही करण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्यास ते ठिकाण बंद करावे लागेल अशा परिस्थितीत तेथील कामगार व कर्मचारी कामावर आहेत असेच समजण्यात यावे. या स्थितीत एखाद्यास कामावरून कमी केले तर ती व्यक्ती आणि त्याचा परिवार एवढ्यावरच आर्थिक परिणाम होणार नाहीत तर एकूणच या साथ रोगाविरुद्ध त्याचे मनोधैर्य खचू शकते आणि याचा व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असेही डॉ कल्याणकर यांनी दिलेल्या पत्रांत म्हटले आहे.

Exit mobile version