Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक व समुपदेशन केंद्र स्थापन ; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक पातळीवर शासकीय स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, जळगाव येथे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सहाय्यक व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

या केंद्राचे उद्घाटन आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण समितीचे सभापती जयपाल बोदडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, बी. ए. बोटे, डिगंबर लोखंडे आदि उपस्थित होते.  या केंद्राची वेळ सकाळी 8.00 ते रात्री 8.00 अशी असून याकरीता नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या केंद्राचा संपर्क क्रमांक 0257-2224268 असा आहे. या दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधल्यास संबंधितांना माहिती मिळू शकेल. तसेच आपल्या अडचणी suvidha.zpjalgaon@gmail.com या संकेतस्थळावरही नोंदविता येतील. कोविड 19 अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही साधनांचा तुटवडा असल्यास, वैयक्तिक आरोग्य विषयक समस्या असल्यास, इतर अडचणी वा समस्या उद्भवल्यास किंवा काही शंका असल्यास त्वरीत समुपदेशन केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. बोटे यांनी केले आहे.

Exit mobile version