Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे : जिल्हाधिकारी

जळगाव (प्रतिनिधी) सद्यस्थितीत जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोना विषाणूचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

 

सद्यस्थितीत जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोना विषाणूचे रूग्ण आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण 93 हजार 90 करोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 3 हजार 198 लोक मुत्युमुखी पडले आहेत. करोना विषाणूची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, निमोनिया, ताप इत्यादि आहेत. कोरोना विषाणुचा प्रसार हा प्रामुख्याने हवेद्वारे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकलणे, हस्तांदोलन इत्यादि कारणांमुळे होतो.
कोरोना आजाराचे अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे रुग्णांनी विशेष काळजी आणि दक्षता घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकतांना नाकावर व तोंडावर रुमाल धरावा तसेच हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक व डोळ्यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये, अर्धवट शिजवलेले तसेच कच्चे मांस खाऊ नये त्याचप्रमाणे आवश्यकता नसतांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

शासनाच्या निर्देशानुसार करोना आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणावरील सर्व गर्दीचे कार्यक्रम नागरिकांनी टाळावेत. कोरोना विषाणू हा आजार संसर्गजन्य असल्याने कार्यक्रमाचे आयोजकांनी गर्दीच्या/सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमांचे उदा. यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदा, गर्दीचे कार्यक्रम, शाळा/महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, प्रदर्शने, धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे व सार्वजनिक उत्सव इत्यादि प्रसंगी योग्य ती काळजी /दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version