Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना वाढत असला तरी जनुकीय रचनेत बदल नसल्याचा दिलासा

 

 मुंबई : वृत्तसंस्था । अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून, तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन,दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही

 

राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून, त्यातच राज्यातील अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे जिल्ह्यात कोरोनाचे परदेशी स्ट्रेन आढळून आल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. त्यावर आरोग्य विभागाने खुलासा केला आहे.

 

“अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे,” असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

 

पुण्यातील १२ नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून, त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत,” असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.

 

 

“या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेकडे जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे,” असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

Exit mobile version