Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लॉकडाऊन : पिंप्राळा रथाची फक्त विधिवत पूजा : भक्तांनी पाळले सोशल डिस्टन्सिंग (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळानगरीत आज बुधवार १ जुलै रोजी भक्तिमय वातावरणात मात्र साध्या स्वरूपात केवळ ५ जणांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. तब्बल १४५ वर्षांची परंपरा असलेल्या प्रसिद्ध पिंप्राळ्याचा रथ प्रथमच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बाहेर निघाला नाही व धावला नाही . यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून आली. तरीही भक्तांनी सोशल डिस्टन्सिंग पालन करत रथाला नमस्कार केला.

श्री विठ्ठल मंदिरात सकाळी शासकीय नियमांनुसार महाआरती शांतता कमिटीचे विष्णू चतुर पाटील, नगरसेवक मयूर कापसे ,मोगरी सेवेकरी माधव भादू महाजन, पुरुषोत्तम सोमाणी, भजनी मंडळ सदस्य अजबसिंग पाटील, संस्थाध्यक्ष मोहन वाणी, जोशी घराण्याचे तिसऱ्या पिढीचे श्याम जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. यानतंर ५ मिनीटांसाठी देवांना रथावर आरूढ करून रथ पाच पाऊल ओढण्यात आला. लागलीच देवांना मंदिरात नेण्यात आले. विठ्ठल मंदिराचे दार बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी बाहेरूनच विठ्ठलाचे दर्शनाचा लाभ घेतला. श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या पिंप्राळा येथे वाणी पंच मंडळाच्यावतीने मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी भाविकांसाठी सर्कल आखण्यात आले होते. तसेच मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांच्या हातावर सॅनिटायझर लावण्यात येत होते. या छोटेखानी कार्यक्रमाला श्री  विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष सुनील वाणी, चिटणीस योगेश चंदनकर, सहचिटणीस नंदकिशोर वाणी, सदस्य कल्पेश वाणी, अक्षय वाणी, रुपेश वाणी, आमंत्रित सदस्य प्रवीण वाणी, संजय वाणी आदींचे सहकार्य लाभले आहे.

 

Exit mobile version