Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय अपेक्षित होताच — टोपे

जालनाः वृत्तसंस्था । देशभरात कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो. हा निर्णय अपेक्षितच होता. लस ही मोफत असायलाच हवी,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

‘आपल्या देशात ३५ टक्के जनता ही दारिद्र रेषेखालील आहे. अशा परिस्थितीत जर आपण लसीकरणासाठी पैसे घेत राहिलो तर अतिशय चुकीचा संदेश सरकारबद्दल जातो. त्यामुळं केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. राज्य सरकार म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ते ज्या सूचना देतील, जे नियम सांगतील त्यांचे आम्ही पालन करु, राज्यातील जनतेच्या सेवेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही,’ असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

लस घेतली म्हणजे कोरोनामुक्त झालो अशा गाफिलपणा बाळगू नका. लसीकरणानंतरही सोशल डिस्टनसिंग आणि मास्क बंधनकारक असणार आहे. लसीचे परिणाम जाणवायला दोन ते चार महिने लागू शकतात, अशा सूचनाही टोपे यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version