कोरोना लस घेतल्यावर लोखंड , नाणी अंगाला चिकटल्याने आश्चर्य !

 

नाशिक : वृत्तसंस्था । कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू तसंच नाणी चिकटत असल्याची अजब घटना समोर आली आहे.

 

नाशिकमध्ये ही घटना घडली असून त्यावरुन आश्चर्य व्यक्त होत आहे. ७२ वर्षीय अरविंद सोनार यांनी आपण कोरोना लस घेतल्यापासून अंगाला या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी लसीचा आणि वस्तू चिकटण्याचा काही संबंध नसल्याचं सांगत दावा फेटाळला आहे.

 

नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद सोनार यांनी ९ मार्चला लस घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. यानंतर २ जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांच्या मुलाने टीव्हीवर एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी साहित्य चिकटत असल्याचं पाहिलं होतं. म्हणून त्याने घरी आई-वडिलांवर प्रयोग करुन पाहिला असता वडिलांच्या शरिराला लोखंड, स्टील आणि नाणी चिकटत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने तात्काळ खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

 

नाशिक महापालिकेने या घटनेची दखल घेतली असून आरोग्य पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. अरविंद सोनार यांची तपासणी केली जात असून नेमका काय प्रकार आहे याची पाहणी केली जात आहे. वेळ पडल्यास त्यांच्या रक्ताची तपासणीही केली जाणार आहे.

 

“अरविंद सोनार यांनी सरकारी दवाखान्यात पहिली लस घेतली होती. ९० दिवसांनी अपोलो रुग्णालयात त्यांनी दुसरी लस घेतली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर स्टील वैगेरे वस्तू चिकटत आहेत. त्यांची तपासणी केल्यानंतर हे नेमकं कशामुळे होत आहे हे स्पष्ट होईल. आतापर्यंत साडे तीन लाखांहून जास्त लोकांना लस देण्यात आली असून इतर व्याधींमुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता कमी आहे,” असं पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

 

अंगाला वस्तू चिकटत असतील तर तपासणी केली पाहिजे. आतापर्यंत अनेकांना लस देण्यात आली असून एखाद्याच्या अंगाला वस्तू चिकटत असतील तर त्याचा लसीशी काही संबंध नााही. शास्त्रीयदृष्ट्या हे शक्य नाही. त्यांच्या त्वचेशी संबंधित एखादी गोष्ट असू शकते जे तपासणीनंतर स्पष्ट होईल, पण याचा आणि लसीचा काही संबंधी नाही”, असं वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांनी  सांगितलं आहे.

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही हा चमत्कार नसून घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. हा विज्ञानाचा एक भाग असून वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल असं त्यांनी सांगितलं आहे.

 

Protected Content