Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लस घेतल्यानंतर २१ दिवसांनी व्यक्तीला सुरक्षा

 

लंडन : वृत्तसंस्था ।  इंग्लंडमधील यूके ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २१ दिवसांनंतर लस घेतलेली व्यक्ती  कोरोना विषाणूपासून सुरक्षित होते.

 

लस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनि शरीर अशा स्थितीमध्ये पोहचतं की ज्यामुळे व्यक्तीला संसर्ग होऊ शकत नाही. लस घेतल्यानंतर २१ दिवस उलटून गेल्यावरही संसर्ग झालाच (याची शक्यता फारच कमी असते) तर त्याचे फारसे दुष्परिणाम होत नाही. रुग्णाची प्रकृती खालावण्याची किंवा त्याला रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता अगदीच कमी असते.

 

लस घेतल्यानंतर २१ दिवसांनंतर शरीरामध्ये संसर्गापासून बचाव करण्यासंदर्भातील अपेक्षित बदल घडतात. मात्र या २१ दिवसांदरम्यान लस घेतलेल्या व्यक्तीने प्रोटोकॉल पाळले नाहीत आणि बेजबाबदारपणे वागल्यास संसर्गाचा धोका असतो.

 

ओएनएसचा हा अहवाल ३१ मे २०२१ च्या आकड्यांवर आधारित आहे. यामध्ये पहिली लस घेतल्यानंतर १६ दिवस  संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो असं सांगण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर पुढील आठवड्याभरात संसर्ग होण्याची शक्यता वेगाने कमी होते. लस घेतल्यानंतर एका महिन्याने  संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असते. लसीकरणानंतर   संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्यानेच लसीकरण हे   सर्वोत्तम हत्यार असल्याचं मानलं जातं.

 

इंग्लंडमधील दोन लाख ९७ हजार ४९३ जणांचे नमुने लसीकरणानंतर घेण्यात आले. त्यापैकी केवळ ०.५ टक्के लोकांना  नव्याने संसर्ग झाल्याचं दिसून आलं. ज्या लोकांनी फायझर-बायोएनटेकची लस घेतली होती त्यांच्यापैकी ०.८ टक्के लोकांना संसर्ग झाला. तर ज्यांनी ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची लस घेतली त्यांच्यापैकी ०.३ टक्के लोकांना संसर्ग झाला. ही आकडेवारी पहिल्या डोसनंतरची आहे.

 

ज्या दोन लाख १० हजार ९१८ जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते, त्यांच्यापैकी ०,१ टक्के लोकांना लसीकरणानंतर संसर्ग झाला. काहींना लस घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच लागण झाली होती. मात्र यापैकी अनेकांना  संसर्ग लस घेण्याच्या आधीच झाल्याचं नंतर स्पष्ट झालं. या लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती किंवा लसीकरण केंद्रावर हे लोक एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. हा अभ्यास इंग्लंडमध्ये कऱण्यात आला असला तरी थोड्या फार प्रमाणात फरक सोडल्यास ही गोष्ट सर्वच लसींसाठी लागू होते, कारण लसींच्या दोन डोसमधील अंतर आणि त्याचे परिणाम या गोष्टी कमी अधिक प्रमाणात सारख्याच आहेत.

 

या संशोधनामध्ये वयोमानानुसार वेगवेगळे परिणाम दिसून आले आहेत. यापैकी एका संशोधनामदरम्यान एकही लस न घेणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आलाय. २० मे ते ७ जूनदरम्यान इंग्लंडमध्ये एक लाख १० हजार स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये संसर्ग दर ११ दिवसांनी दुप्पट झाल्याचं पहायला मिळालं. म्हणजेच ६७० पैकी दर एका व्यक्तीला संसर्ग झाला. वायव्य इंग्लंडमध्ये हे प्रमाण अधिक होतं.

 

लंडनमधील इंपीरियल कॉलेजचे संशोधक आणि या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या स्टीवन रिले यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी तरुणांमध्ये  संसर्गाचा वेग अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. युनायटेड किंग्डममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संसर्गाचे प्रमाणही वेगवेगळे आहे. त्यामुळेच देशभरातील संसर्गाचे प्रमाण काढणे कठीण असल्याचं रिले सांगतात.

 

 

इंपीरियल कॉलेजचेच दुसरे संशोधक पॉल एलियन यांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त खोलात जाऊन अभ्यास केला तर थक्क करणारी माहिती समोर येते. उदाहरणार्थ ज्या वयस्कर लोकांनी  लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांना संसर्गाचा धोका फार कमी असतो. ते लोक अधिक सुरक्षित असतात. मात्र ६५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांमध्ये हे दिसून येत नाही. त्यांनी एक डोस घेतलेला असो किंवा दोन त्यांच्यामध्ये  संसर्गाचं प्रमाण अधिक आढळतं. अर्थात एकूण लसीकरणाच्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी आहे.

 

Exit mobile version