Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लसीच्या कच्च्या मालाचा तुटवडा ; अदर पुनावालांची जो बायडेन यांना हात जोडून विनंती

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अमेरिका आणि युरोपने कोरोना लसीच्या कच्च्या मालाचा पुरवठा थांबवला असल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली आहे.

 

देशात एकीकडे लसीकरण सुरु असताना अनेक राज्यं लसींचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार करत आहेत. लसीकरणावरुन अनेक राज्यं आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आले असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

 

“अमेरिका आणि युरोपमधून  लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र, त्यांनी त्याचा पुरवठा थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्युटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे”, असं अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.  आता त्यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ट्विटमध्ये टॅग करत विनंती केली आहे.

 

ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, “आदरणीय जो बायडेन…जर आपण खरंच कोरोनाविरोधातील लढाईत एकत्र आहोत तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे”.

 

अदर पुनावाला यांनी याआधीही कच्च्या मालाचा मुद्दा उपस्थित केला होता.यावेळी त्यांनी शक्य असतं तर मीच अमेरिकेत जाऊन आंदोलन केलं असतं असं म्हटलं होतं. “मला शक्य असतं तर मी अमेरिकेत गेलो असतो आणि स्वत: अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं असतं. त्यांना सांगितलं असतं की तुम्ही फार महत्त्वाचा असा कच्चा माल रोखून धरला आहे. भारतातीलच नाही, तर जगभरातील  लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा कच्चा माल आवश्यक आहे”, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं होतं.

 

“आम्हाला लसीसाठी महत्त्वाचा असलेला कच्चा माल आत्ता हवा आहे. सहा महिने किंवा वर्षभरानंतर आम्हाला त्याची आवश्यकता नसेल. कारण तोपर्यंत आम्ही दुसऱ्या पुरवठादाराकडून तो माल मिळवण्याची व्यवस्था केली असेल. पण आत्ता या घडीला आम्हाला अमेरिका आणि युरोपकडून येणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता आहे”, असं पूनावाला यांनी स्पष्ट केलं होतं.

Exit mobile version