Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे जारी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । देशात कोरोना लसीचा सुरुवातीला प्रत्येक सत्रात फक्त १०० लोकांना डोस दिला जाणार आहे. उपलब्धता आणि तयारी उत्तम झाली तर ही संख्या २०० पर्यंत पोहोचू शकणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनीस्ट्रेशनने यासाठी गाइडलाइन तयार केली आहे.

आरोग्य मंत्रालयाचे एक विशेष पथक या ११२ पानी गाइडलाइनची समीक्षा करणार आहे. या गाइडलाइननुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आपापल्या प्रदेशातील लसीकरणाचा दिवस ठरवणार आहेत. केंद्र सरकारने पुढील ६ ते ८ महिन्यांमध्ये देशातील ३० कोटी लोकांना लस टोचण्याची तयारी केली आहे. औषध निर्मिती कंपन्यांकडून ६० कोटी डोस खरेदी केले जाणार आहेत.

लशीचे स्टोअरेज करण्यासाठी उणे २ ते ८ डिग्री सेल्सियस इतक्या क्षमतेच्या कोल्ड स्टोरेजच्या सुविधेची व्यवस्था करण्यात येत असल्याचे नॅशनल ग्रुप ऑफ एक्स्पर्ट ऑन कोविड-१९ व्हॅक्सिनेशनचे चेअरमन आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. देशात एकूण ४ लशी अशा आहेत ज्या सहजपणे स्टोअर केल्या जाऊ शकतात, असेही पॉल म्हणाले. यात सीरम इन्स्टीट्यूट, भारत बायोटेक, झायडस आणि स्पिटनिकच्या लशींचा समावेश आहे.

देशात ज्या लोकांना प्रथम लशीची आवश्यकता आहे, १ कोटी आरोग्य कर्मचारी, २ कोटी फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. यात डॉक्टर्स, नर्स, पोलिस, होम गार्ड्स, सशस्त्र दल, सिव्हील डिफेन्स, महापालिका कर्मचारी, आपत्कालीन व्यवस्थापनाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. वयाच्या हिशेबाने देखील लस देण्याला प्राथमिकता दिली जावी. ५० वर्षांच्या वर आणि ५० वर्षांच्या खाली असलेल्या लोकांचे दोन ग्रुप तयार करावेत. ज्या लोकांना आधीपासूनच कोणते आजार असतील अशा लोकांनाही प्राधान्य दिले जावे. अशा लोकांची संख्या देशात २७ कोटी इतकी आहे. प्रत्येक सत्रात १०० लोकांना लस दिली जाईल. यात सर्वाधिक संख्या आरोग्यक्षेत्र आणि फ्रंटालाइन वर्कर्स यांची असेल. मात्र हाय रिस्क असलेले लोकांचाही यात समावेश करण्यात येईल. आरोग्यक्षेत्र आणि फ्रंटलाइन वर्कर्सना एकाच जागी लस दिली जाईल.

राज्य सरकारे आपल्या सुविधांनुसार, शाळा, कम्युनिटी हॉल किंवा तंबूंमध्ये लसीकरण केंद्र स्थापन केली जाऊ शकतील. लसीकरण केंद्रात पिण्याचे पाणी, टॉयलेट आदि सुविधा देण्यात येतील. लशीचा डोस दिल्यानंतर डॉक्टर्स आणि इतर तज्ज्ञ प्रत्येक उमेदवारावर ३० मिनिटे लक्ष ठेवतील. जर या काळात कोणाला साइड इफेक्ट झाल्याचे जाणवले, तर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले जाईल. लसीकरण प्रक्रियेची संपूर्ण माहिती, रजिस्ट्रेशन, लसीकरणाची तारीख अशी माहिती देण्यासाठी को-विन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे.

Exit mobile version