Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लसीकरणाचे राजकारण

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था | काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश व शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. मात्र, आता कोरोना लसीवरून राजकीय वादंग सुरू झाल्याचे दिसत आहे.

 

“कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झालेली नाही. या वॅक्सीनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे हे धोकादायक ठरू शकतं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणं टाळायला हवं. दरम्यान भारत अ‍ॅस्ट्रॅजेनेका वॅक्सीनसह मोहीम सुरू करू शकतो.” असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

तर, जयराम रमेश यांनी देखील कोव्हॅक्सिनबद्दल आक्षेप नोंदवला असून, “भारत बायोटेक प्रथम श्रेणीचा उद्योग आहे. परंतु आश्चर्यकारक बाब ही आहे की, कोव्हॅक्सिनसाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी संबंधी आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळालेल्या प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे.”

या अगोदर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वॅक्सीनबाबत शंका उपस्थित केली होती. तसेच, मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा काय विश्वास ठेवू? असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आज त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसून आलं. लसीकरणास लवकरात लवकर सुरूवात व्हावी, असं अखिलेश म्हणाले आहेत.

समाजवादी पार्टीचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी देखील करोना वॅक्सीनबद्दल आज वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. या वॅक्सीनमुळे तुम्ही नपुंसक होऊ शकतात असं खळबळजनक विधान सिन्हा यांनी केलं आहे.

दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आल्याचे आज डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन सांगितल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असल्याचं म्हणत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Exit mobile version