Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : राज्यात ५५२ नवे कोरोनाग्रस्त; बारा जणांचा मृत्यू

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात रविवारी करोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता एकूण रुग्ण संख्या ४२०० झाली आहे. १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ नागरिक होम क्वारंटाइनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात १२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई येथील ६ आणि मालेगाव येथील ४ तर, एक मृत्यू सोलापूर महापालिका क्षेत्र आणि एक मृत्यू अहमदनगरमधील जामखेड येथील आहे. मृतांमध्ये ४ पुरुष, तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत, तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.

Exit mobile version