Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत

मुंबई, वृत्तसेवा । करोनाची साथ पसरलेली असताना पोलीस जीव धोक्यात घालून काम करत आहेत. करोनाविरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावत असताना करोनामुळे दुर्देवानं मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्तवपूर्ण बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. करोनाची साथ पसरलेली असताना पोलीस जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशावेळी एखाद्या पोलिसाचा करोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Exit mobile version