कोरोना प्रसार मंदावल्याचा सरकारचा दावा तज्ज्ञांना अमान्य

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आङे. मात्र  आरोग्य  तज्ज्ञांनी संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा फेटाळून लावला. तज्ज्ञांच्या  अंदाजानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक हा १५ जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे.

 

केंद्र सरकारने सोमवारी काही राज्यांमधील  दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र दिल्ली आणि महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमधील रुग्णसंख्या स्थिरावली असल्याचे प्राथमिक संकेत मिळत असल्याचं म्हटलं आहे.

 

आरोग्य मंत्राल्याचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिल्ली, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब, झारखंड आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये स्थिरता आल्याचे संकेत मिळत असल्याचं सांगितलं. बिहार, राजस्थान, हरयाणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे, असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

 

दिल्लीमध्ये २४ एप्रिल रोजी २५ हजार २९४ नवे रुग्ण आढळून आले. दोन मे रोजी हा आकडा २४ हजार २५३ इतका होता. २४ एप्रिलला महाराष्ट्रात ६५ हजार ४४२ नवे रुग्ण आढळून आलेले. २० एप्रिलला हा आकडा ६२ हजार ४१७ होता तर तीन मे रोजी राज्यात ४८ हजार ६२१ नवीन बाधितांची नोंद झाली. मागील ३० दिवसांमध्ये पहिल्यांदाच हा आकडा ५० हजारांच्या खाली आळा आहे. छत्तीसगडमध्ये २९ एप्रिल रोजी १५ हजार ५८३ रुग्ण आढळून आले तर दोन मे रोजी ही संख्या १४ हजार ८७ पर्यंत खाली आली. याचप्रमाणे दीव-दमण, गुजरात, झारखंड, लडाख, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे.

 

छत्तीसगडमधील दुर्ग, गरियाबंद, रायपुर, राजनांदगाव तर मध्य प्रदेशमधील छिंदवाडा, गुना, शाजापुरमध्ये रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. तेलंगणमधील निर्मल तसेच केंद्रसाशित प्रदेश असणाऱ्या लेह, लडाखमध्येही १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये मागील १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे. या आकड्यांच्या आधारे परिस्थितीचं विश्लेषण करणं घाईचं ठरेल. जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवणं गरजेचं आहे. असं केल्यानेच आपण यावर नियंत्रण मिळवून दैनंदिन संख्या कमी करु शकतो,” असं अग्रवाल म्हणाले.

 

एक लाखांहून अधिक उपाचराधीन रुग्ण असणाऱ्या राज्यांची संख्या १२ असल्याचंही अग्रवाल म्हणाले. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. ५० हजाराहून रुग्ण उपचाराधीन असणाऱ्या राज्यांची संख्या सात आहे. १७ राज्यांमध्ये ५० हजारांहून कमी रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर सध्या करोनाचे उपचार सुरु आहेत. २२ राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक असल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे. नऊ राज्यांमधील संसर्गाचं प्रमाण ५ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. पाच राज्यामध्ये संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांहून कमी असल्याचा खुलासा अग्रवाल यांनी केलाय.

 

अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मिझोरम, नागालॅण्ड, मेघालय, ओदिशा, पुद्दचेरी, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे.

 

लसीकरणासंदर्भातील महिती देताना अग्रवाल यांनी आतापर्यंत देशामध्ये लसीचे १५ कोटी ७२ लाख डोस देण्यात आल्याचं सांगितलं. यापैकी १२ कोटी ८३ लाख जणांना पहिला तर २ कोटी ८९ जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील दोन लाख जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. अग्रवाल यांनी १२ राज्यांमध्ये एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याची माहिती दिली. सरकार सध्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी नायट्रोजन निर्माण करणारी यंत्र वापरता येतील का यासंदर्भातील विचार करत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

 

आरोग्य तज्ज्ञांनी दुसरी लाट ओसरण्याची सध्या शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रामधील लाटेसंदर्भात बोलताना टास्क फोर्सचे सदस्य डॉ शाशांक जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच  दुसरी लाट मुंबईतून ओसरल्याची चिन्ह दिसत असली तरी त्याचा प्रभाव महाराष्ट्रात कमी होण्यास  २१ मे ते १५ जूनदरम्यानचा कालावधी लागेल असं म्हटलं होतं. देशातील अनेक राज्यांमध्ये आता रुग्णसंख्या वाढत असतानाच एवढ्या घाईघाईत संसर्ग ओसरण्यास सुरुवात झाल्याचं म्हणणं चुकीचं ठरेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. काही राज्यांमध्ये काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी अनेक राज्यांमध्ये ती वाढत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. लसीकरणाचा वेग मंदावला तर अनेक ठिकाणी तिसरी लाट येईल अशी भीतीही व्यक्त केली जातेय.

Protected Content